Sun, Mar 24, 2019 12:26होमपेज › Ahamadnagar › छेडछाडीचा नवा प्रकार; मुलींना दिले जातेय नशेचे चॉकलेट

‘तो मला बळजबरी चॉकलेट खाऊ घालतोय’

Published On: Dec 16 2017 1:38AM | Last Updated: Dec 16 2017 12:32PM

बुकमार्क करा

कोळपेवाडी : वार्ताहर

एकीकडे कोपर्डी घटनेच्या जखमा ताज्या असतानाच कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव परिसरात नशेत धुंद असलेल्या व्यक्तिकडून एका अल्पवयीन शाळकरी मुलीची छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार काल शुक्रवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास बसस्थानक परिसरात घडला. यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला असून स्थानिक तरुणांनी या मुलीची सुटका करून या व्यक्तिला पोलिसांच्या ताब्यात दिले.

सुरेगाव परिसरात असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने बांधलेल्या एस. टी. थांबा परिसरात एक अनोळखी व्यक्ती अंदाजे पाच ते सहा वर्षे वयाच्या मुलीचा हात धरून तिला ओढण्याचा प्रयत्न करीत होता. ही मुलगी आपला हात त्याच्या हातातून सोडविण्याचा प्रयत्न करीत होती. त्यावेळी व्यंकटेश भुजबळ, परवेज मनियार, ऋषिकेश भुजबळ तेथून चालले असताना त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी त्या मुलीकडे चौकशी केली असता, त्या मुलीने सांगितले, हा माणूस माझ्या ओळखीचा नाही. तो मला बळजबरी चॉकलेट खाऊ घालत आहे. 

एकंदरीत हा प्रकार काहीतरी वेगळा असल्याचा संशय आल्यावर या तरुणांनी त्या नशेत धुंद असलेल्या व्यक्तिला विचारले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे नशेचे चॉकलेट असल्याचे निदर्शनास आले. तोपर्यंत काय झाले, म्हणून बघ्यांची गर्दी जमली होती. ज्यावेळी या व्यक्तिकडे नशेचे चॉकलेट आढळले. त्यावेळी उपस्थित जमावाने त्या नशेबाज व्यक्तिला चांगलाच चोप देऊन कोळपेवाडी पोलिस चौकीशी संपर्क साधून घडलेल्या प्रकारची माहिती दिली. त्यानंतर काही वेळेतच पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्या व्यक्तिला ताब्यात घेतले. सुरेगावमधील तरुणांनी अजून एक कोपर्डीची घटना घडू दिली नाही. त्यामुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.