Mon, Aug 26, 2019 01:28होमपेज › Ahamadnagar › फसव्या कर्जमाफीचे पाप भोगावे लागेल : आशुतोष काळे

फसव्या कर्जमाफीचे पाप भोगावे लागेल : आशुतोष काळे

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 1:21AMकोळपेवाडी : वार्ताहर

पुणतांब्यासह राज्यातील शेतकर्‍यांचे आंदोलन अजून दोन दिवस चालले असते, तर शेतकार्‍यांना न्याय मिळाला असता. परंतु शेतकर्‍यांचे आंदोलन आमदार कोल्हे यांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या फसव्या कर्जमाफीचे पाप आमदार स्नेहलता कोल्हे यांना भोगावे लागेल, अशी टीका युवानेते आशुतोष काळे यांनी केली.

कोपरगाव शहरामध्ये राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या सभेतील आशुतोष काळे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने सेना-भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वादातून एकमेकांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केल्याने आमदार कोल्हे यांनी आशुतोष काळे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी काळे यांनी शहरातील गौतम बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषद घेतली. 

काळे म्हणाले की, शहरातील हल्लाबोल आंदोलनाच्या सभेला अभूतपूर्व गर्दी पाहिल्याने विरोधकांना धास्ती वाटत आहे. हल्लाबोलच्या सभेने संपूर्ण तालुक्यासह राज्याचे वातावरण बदलत आहे. कोपरगावच्या इतिहासातील सर्वांत मोठी सभा झाल्याने विरोधकांनी सभा झाल्याबरोबरच सभेचा निषेध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मूळ प्रश्‍नाला बगल देऊन काहीतरी विषय काढून विचलित करण्याचे काम आमदार कोल्हे करीत आहेत. कोणताही विषय अंगलट आला की, मी महिला आमदार आहे, असे सांगतात. 2014 पासून हे असेच चालू आहे. परंतु त्या राज्यात एकट्याच महिला आमदार आहेत का? असा सवाल काळे यांनी केला. 

आमदार कोल्हे यांचा निवडणुकीत कोणत्याही कर्तृत्त्वाचा विषय नव्हता. केवळ लाटेमुळे निवडून आल्या आहेत. मतदारसंघात 100 कोटींची आश्‍वासन देतात, मात्र, प्रत्यक्षात काहीच नाही. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या काळात तहसील कार्यालय व इतर अनेक इमारतींचे कामे पूर्ण झाले आहेत. तालुक्याच्या आमदार स्नेहलता काकू यांना गाजराची उपाधी दिली. पण या सरकारलाच गाजराची उपमा जनतेने दिली आहे. त्यात कोणतीही अश्‍लिलता नाही, असेही काळे म्हणाले.

आमदार स्नेहलता काकू नेहमी मला मुलासारखे समजतात मग कोणती आई मुलाचा पुतळा दहन करण्यास सांगते? असाही प्रश्‍न काळे यांनी केला. पोलिसांमध्ये पहिला खोटा गुन्हा सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. मग आम्ही गुन्हा दाखल केला. वाद-विवादाच्या वेळी महिला कार्यकर्त्या बाजूला निघून गेल्याचे व्हिडिओ रेकॉर्डमध्ये स्पष्ट दिसत असतानाही खोटा गुन्हा दाखल केल्यामुळेच आम्ही तसाच गुन्हा दाखल केला आहे. सुरुवात त्यांच्यापासून झाली असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, गटनेते विरोन बोरावके, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, हिरामण गंगुले, गणेश लकारे, वाल्मिक लहिरे, डॉ. अनिरुद्ध काळे, नवाज कुरेशी  उपस्थित होते.  ताकद न राहिल्याने  विरोधक महिलांना पुढे करीत आहेत. परंतु आम्हाला महिलांविषयी आदर आहे. कोणत्याही महिलेला विरोधकांनी केलेल्या आरोपाप्रमाणे काहीही झालेले नाही. तसे त्या महिलांच्या कुटुंबियांनाही माहीत आहे, असे सुनील गंगुले यांनी स्पष्ट केले.

विनयभंग करणारे कार्यकर्ते कोणाच्या बाजूने आहे. ते सर्वांना माहित आहे, अशी टीका कोल्हे यांचे नाव न घेता संदीप वर्पे यांनी केली. 
शहरातील बेकायदा कत्तलखाने बंद करावे, बेकायदा कत्तलखाना चालविलणार्‍यांवर कारवाई करावी, यासाठी आज कोपरगाव शहर बंदचे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले.  आजच्या बंदला राष्ट्रवादीचा विरोध आहे, असे संदीप वर्पे यांनी सांगितले.