Tue, Apr 23, 2019 18:21होमपेज › Ahamadnagar › कुख्यात पपड्या गँगमधील 8 जण अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

कोळपेवाडी दरोड्याचा उलगडा

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 07 2018 1:04AMनगर : प्रतिनिधी

कोळपेवाडी येथील खुनासह सराफ दुकानावरील दरोड्याचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. या गुन्ह्यात कुख्यात पपड्या टोळीतील 8 जणांना जेरबंद करण्यात आले आहे. टोळीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून 65 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. दागिने घेऊन पसार झालेला म्होरक्या पपड्या अजून हाती लागलेला नाही.  

अटक केलेल्यांमध्ये किरण बंडू काळे (23), अजय बंडू काळे (22, दोघे रा. साईनाथनगर, नागफणी, नेवासा बुद्रूक, ता. नेवासा), राजकुमार नारायण काळे (20, रा. सैलानी, ता. चिखली, जि. बुलढाणा, हल्ली रा. मु. पो. सलाबतपूर, ता. नेवासा), जितू रामदास भोसले (39, रा. जोगेश्‍वरी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), महेंद्र बाबुशा पवार (21, रा. बोरखेड, ता. जि. बीड), विक्रम रजनीकांत भोसले (22, रा. तांबे मळा, बुरुडगाव रोड, व्हीआरडीईमागे, नगर), अक्षय भीमा जाधव (25, रा. कोळपेवाडी, सहाचारी, कोपरगाव), बुच्या रामदास भोसले (43, रा. बागेवाडी, पोस्ट-तळवडा, जि. बीड) यांचा समावेश आहे. या गुन्ह्यातील 13 आरोपी अजून फरार आहेत.

टोळीचा म्होरक्या पपड्या ऊर्फ संजय ऊर्फ राहुल व्यंकटी ऊर्फ महादू ऊर्फ महादेव ऊर्फ गणपती काळे (रा. वर्धा) याच्याविरुद्ध खून, खुनासह दरोडा, पोलिस उपनिरीक्षकाच्या खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर आल्यानंतर त्याने दरोड्याचा कट रचला होता. आरोपींना नेवासा, औरंगाबाद, गेवराई, बीड येथून अटक केली आहे. 

टोळीने दरोड्यापूर्वी काही दिवस अगोदर दुकानाची टेहळणी केली होती. त्यानंतर पद्धतशीरपणे नियोजन करून दरोडा टाकला होता. गुन्ह्यात 5 देशी बनावटीचे पिस्तूल, हातबॉम्ब, गलोल वापरली होती. 
पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक जयंत मीना, रोहिदास पवार, पोलिस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे, सचिन खामगळ, श्रीधर गुठ्ठे, सहाय्यक फौजदार नाणेकर, कर्मचारी सुनील चव्हाण, योगेश गोसावी, दत्ता हिंगडे, मन्सूर सय्यद, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, रवींद्र कर्डिले, अण्णा पवार, संदीप पवार, संभाजी कोतकर, विजयकुमार वेठेकर, भाऊसाहेब काळे, सचिन मिरपगार, भागिनाथ पंचमुख आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. 

पपड्यासह 13 जण फरार

या गुन्ह्यातील टोळीचा म्होरक्या पपड्या काळे याच्यासह त्याच्या टोळीतील श्रीमंत ईश्‍वर काळे (रा. मिटमिटा, ता. जि. औरंगाबाद), सुंदरलाल रंधवा भोसले (रा. कोपरगाव), शहाराम छगन भोसले (रा. नागफणी, नेवासा), पप्पू ऊर्फ प्रशांत रजिकर्‍या भोसले (रा. वाळकी, ता. नगर), शंकर गोरख भोसले (रा. सिल्लोड, औरंगाबाद), अक्षय संतोष चव्हाण (रा. सिल्लोड, जि. औरंगाबाद), क्रांती शांतीलाल भोसले (रा. वजीरखेडा, ता. भोकरदन, जालना), लखन कांतीलाल पवार, उमेश कांतीलाल पवार, कांतीलाल पवार (तिघे रा. मिसाळवाडी, ता. परांडा, उस्मानाबाद), मीनाक्षी राहुल काळे (रा. वर्धा) व आणखी एक महिला फरार आहे. 

टार्गेट औरंगाबाद, लूट कोळपेवाडीत!

पपड्या टोळीने सुरुवातीला औरंगाबाद शहरातील एका सराफ व्यावसायिकाला लुटण्याचा कट रचला होता. त्यासाठी पाळतही ठेवली होती. परंतु, लुटीच्या दिवशी रस्त्याने जाताना संबंधित सराफ हातात सोन्याची पिशवी घेऊन गेलाच नाही. त्यामुळे पपड्या टोळीने प्लॅन बदलला व कोळपेवाडी टार्गेट केली. तेथे काही दिवसांसाठी सराफ दुकानाचे काम पत्र्याच्या शेडमध्ये होत असल्याचा फायदा घेत तेथे लूट केली.