होमपेज › Ahamadnagar › कीर्तनकार सोनाली बनली तहसीलदार  

कीर्तनकार सोनाली बनली तहसीलदार  

Published On: Jul 29 2018 1:20AM | Last Updated: Jul 28 2018 11:25PMराहुरी : प्रतिनिधी

लहान वयातच पितृछत्र हरपलेल्या युवतीने आपल्या वहडलांप्रमाणे कीर्तनातून समाजप्रबोधन करतानाच जिद्द व चिकाटीच्या जोरावर आईने  पाहिलेले तहसीलदार पदाचे स्वप्नही साकार करून महिलांसमोर एक आदर्श उभा केला. आई-वडिलांची इच्छापूर्ती आणि पतीचा विश्‍वास सार्थ ठरवलेल्या कीर्तनकार सोनाली किरण तागड यांच्या यशाबद्दल राहुरी तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.

11 महिने वय असतानाच सोनालीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले होते. आई मिनाबाई यांनी सोनालीला वडीलांच्या प्रेमाची उणीव भासू न देता काबाडकष्ट करून शिक्षण दिले.  सोनालीने कीर्तनकार असलेले वडील कै. नारायण गावडे यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत समाजप्रबोधन सुरू केले. आळंदीचे विठ्ठल बाबा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तनाचे धडे आठवीत असतानाच तिने गिरवायला सुरुवात केली.   तिच्यातील धमक पाहून मुलीला अधिकारी बनविण्याचे स्वप्न मिनाताई गावडे यांनी तेव्हाच पाहिले होते. मेंढीपालन, शेती किंवा मोलमजुरी करणार्‍या समाजातील मिनाताई यांनी समाजात शिक्षणाबद्दल असणारी उदासिनता पाहून मुलीच्या शिक्षणासाठी सोनालीला सावेडी येथे शाळेत घातले. 

सुमधूर आवाजाने समाजप्रबोधनात्मक कीर्तन करणार्‍या सोनालीने दहावीला 85 टक्के गुण मिळविले. पुढे अभियांत्रिकीच्या डिप्लोमाला प्रवेश घेतला आणि बी.ई.ची पदवी प्राप्त केली.  त्यानंतर लग्नबंधनात अडकल्यानंतर पती कापड व्यावसायिक किरण तागड यांच्यासह संसाराचा गाडा ओढण्याची जबाबदारी सोनालीवर आली. हे करत असताना तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला. पती किरण  यांनी पत्नी सोनालीची जिद्द पाहून  तिच्यामागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. अखेर सन 2018 साली जाहिर झालेल्या परिक्षेच्या निकालात सोनाली तागड यांची तहसीलदार पदी निवड झाल्याची आनंददायी वार्ता कुटुंबीयांना समजताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.राहुरी तालुक्यातही सोनाली तागड यांचा सर्वच क्षेत्रातून सन्मान केला जात असल्याचे दिसत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ती तहसीलदार झाली.