Tue, Apr 23, 2019 13:35होमपेज › Ahamadnagar › ...अन् जाताना ती देऊन गेली दोघांना दृष्टी!

...अन् जाताना ती देऊन गेली दोघांना दृष्टी!

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 05 2018 11:39PMश्रीगोंदा ः प्रतिनिधी 

हृदयाच्या आजाराने त्रस्त असणार्‍या किरण विकास शिंदे (वय 17) या तरुणीचे बुधवारी (दि.5) सकाळी निधन झाले. आपल्या डोळ्यांनी अंध व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण व्हावा, यासाठी किरणने मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिची ही इच्छा पूर्ण  करण्याची जबाबदारी दौंड येथील नेत्रतज्ञ प्रेमकुमार भट्टड यांनी पार पाडली.  किरणचे डोळे पुणे येथील रुबी आयबँककडे पाठविण्यात आले आहेत. किरणच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्ती हे जग पाहू शकणार आहेत. 

श्रीगोंदा शहरातील विकास शिंदे व सुनीता शिंदे या जोडप्याला किरण व ओंकार ही दोन गोंडस मुले. वडील रिक्षा चालवतात. तर आई बोरा ज्वेलर्समध्ये कामाला. किरणचे हृदय लहानपणापासून कमकुवत होते. अशा परिस्थितीत आई-वडिलांनी किरणचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. हे करत असताना त्यांना डॉ.अनिल घोडके व सतीश बोरा यांनी वैद्यकीय कामासाठी खूप मदत केली.

किरण शाळेत फार हुशार होती. अकरावी इयत्तेत श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेतला. अशातच पुन्हा हृदयाचा त्रास झाला. मृत्यूशी झुंज चालू असताना आपण फार काळ जगू शकत नाही. याची तिला जाणीव झाली. त्याच दरम्यान बारामती येथील डॉक्टरांनी तिला तीन दिवसांपूर्वी घरी घेऊन जाण्यास सांगितले. 

घरी येताना सतिश बोरा यांना तिने आपली मरणापूर्वीची इच्छा व्यक्त केली.  किरण म्हणाली,  काका तुम्ही  माझ्यासाठी तुम्ही खुप प्रयत्न केले.  मी गेल्यानंतर माझे डोळे दान करा.  माझ्या नेत्रदानातून दोघेजण सुंदर जग पाहतील याचा मला मोठा आनंद होईल. बुधवारी सुर्योदय  होत असताना किरणने जगाचा निरोप घेतला. किरण आपल्याला सोडून गेल्याचे समजताच किरणच्या आई- वडील , नातेवाइकानी हंबरडा फोडत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.