Wed, Jul 24, 2019 08:01होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या!

जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या!

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 03 2018 12:20AMनगर : प्रतिनिधी

यंदाच्या खरीप हंगामात पेरणीच्या सुरुवातीलाच पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊस नसल्याने अवघ्या 20 टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली असून, शेतकर्‍यांना पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा आहे. लवकर पाऊस न  शेतकर्‍यांपुढील संकटात वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात एकूण 87 हजार 767 हेक्टरवरच खरिपाच्या पिकांची पेरणी झाली आहे. त्यामध्ये तृणधान्य, कडधान्य व अन्नधान्याचे प्रमाण मोठे असून उसाची अवघी 0.38 टक्केच लागवड करण्यात आलीआहे. अनेक ठिकाणी खरीप हंगामासाठी पूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली असून, पेरणीयोग्य पाऊस कधी पडतो याकडे शेतकर्‍यांच्या नजर लागल्या आहेत.

यंदा जिल्ह्यात सरासरी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या अंदाजावरून शेतकर्‍यांनी शेतीच्या कामांची तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकर्‍यांनी खरीप पूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी पेरणीची कामे सुरु आहेत. जिल्ह्यात उसासह एकूण 5 लाख 28 हजार 858 हेक्टर शेती क्षेत्र आहे. त्यापैकी 87 हजार 767 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. त्यामध्येही 4 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस असला तरी तो खोडव्याचा आहे. एकूण क्षेत्राच्या हे प्रमाण 0.38 टक्के आहे. तसेच उसाशिवाय एकूण क्षेत्र हे 4 लाख 24 हजार 496 हेक्टर आहे. त्यापैकी 87 हजार 366 हेक्टरवर इतर पिकांची पेरणी झाली आहे.

तृणधान्यांच्या पिकांमध्ये भात, ज्वारी, बाजरी, रागी, मका तसेच इतर खरीप तृणधान्यांच्या समावेश आहे. त्यापैकी बाजरी व मका पिकाची पेरणी झाली आहे. एरवी अकोले तालुक्यात होणारी भाताची लागवड पाऊस नसल्याने कमी झालेली आहे. जूनच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत अकोल्यात भाताची लागवड होत असते. यावर्षी पाऊस उशिरा आल्याने भाताची लागवड अत्यल्प झाली आहे. 15 हजार 572 हेक्टरवर बाजरीची पेरणी करण्यात आली आहे. मक्याची पेरणी 2 हजार 236 हेक्टरवर झाली आहे. जिल्ह्यात एकूण 18 हजार 62 हेक्टरवर तृणधान्याची पेरणी, लागवड झाली आहे.

खरीप कडधान्यांमध्ये तूर, मूग, उडीद व इतर कडधान्यांचा समावेश होतो. त्यामध्ये 7 हजार 581 हेक्टरवर तूर, 10 हजार 971 हेक्टरवर मूग, 14 हजार 640 हेक्टरवर उडीदाची पेरणी करण्यात आली आहे. तेलबियामध्ये भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल, सोयाबीन,व इतर तेलबिया यांचा समावेश आहे. त्यात 69 हेक्टरवर भुईमूग, 4 हेक्टरवर तीळ, 2 हेक्टरवर सूर्यफूल, 6 हजार 449 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी शेतकर्‍यांनी केली आहे. 18 हजार 395 हेक्टरवर कापसाची टोपणी झाली आहे.जिल्ह्यात बाजरीचे सर्वाधिक सरासरी 1 लाख 60 हजार 187 हेक्टर क्षेत्र आहे. टक्केवारीचा विचार केला असता तुलनेत 9.72 टक्के बाजरीची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल 54 हजार 753 हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र आहे. परंतु पेरणी 11.78 टक्केच झाली.