Sat, Aug 17, 2019 16:11होमपेज › Ahamadnagar › पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात

पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात

Published On: Jul 30 2018 1:28AM | Last Updated: Jul 29 2018 10:36PMसंगमनेर : प्रतिनिधी

आकाशात ढग दाटून येतात,  पावसाचे वातावरणही तयार होते. मात्र, पाऊस हुलकावणी देत असल्याने तब्बल महिन्यापासून तालुक्यावर पावसाने डोळे वटारले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी महागडी बियाणे खरेदी करून पेरणी केलेली खरीप पिके धोक्यात सापडल्याचे चित्र संगमनेर तालुक्यात पाहायला मिळत आहे.

पश्‍चिम बंगालच्या महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे  पाऊस गायब झाल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. चालू वर्षी संगमनेर तालुक्यात अवघा अडीशे ते तीनशे मि.मी पाऊस पडला आहे. त्या पावसावर तालुक्यात खरिपाची सरासरी 69 हजार 200 हेक्टर क्षेत्रापैकी 42 हजार 558 क्षेत्रावर 61 टक्के पेरणी झाली आहे.त्यात यावेळी बाजरी पिकाच्या सरासरी 54 हजार 800 पैकी अवघ्या 20 हजार 417 हेक्टरवर म्हणजेच निम्याला निम्म्याने पेरणी कमी झाली आहे. याउलट मकाचे सरासरी 1300 हेक्टर क्षेत्र असतानाही यावर्षी तालुक्यात मकाच्या 4 हजार 769 हेक्टरवर शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या आहे.

यावर्षी बाजरीपेक्षा मका पीक सरस झाले आहे. त्या खालोखाल ऊस या पिकाखाली तालुक्यात सरासरी 7 हजार 300 हेक्टर क्षेत्रापैकी यावर्षी अवघ्या 1 हजार 226 हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात सोयाबीनची  पेरणी होत असते. मात्र, यावेळी सोयाबीनसाठी सरासरी 2 हजार 500 हेक्टर क्षेत्र असताना त्यात वाढ होऊन सरासरी 3 हजार 524 हेक्टरवर क्षेत्रावर शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरण्या केल्या आहेत. एकूणच, खरिप पिकाच्या पेरण्या कमी प्रमाणात झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.

शेतकर्‍यांनी महागडी  बियाणे खरेदी करून पहिल्या एक दोन पावसाच्या भरवशावर  खरीप पेरण्या केल्या. मात्र, गेली पंधरा ते वीस दिवसांपासून अचानक पावसाने डोळे वटारल्यामुळे शेतात उभी असलेली पिके आता माना  टाकू लागली आहेत.  तसेच ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग व कीडीचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली असून त्याचा पिकांच्या वाढीवर सुद्धा प्रतिकूल परिणाम दिसू लागला आहे.
दरम्यान, गेल्या पंधरवड्यापासून संगमनेरसह पठार भागात पावसाने दडी मारल्याने पिके माना टाकू लागले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.