Tue, May 21, 2019 18:11होमपेज › Ahamadnagar › केजरीवालांच्या मुलांनी घेतली हजारेंची भेट

केजरीवालांच्या मुलांनी घेतली हजारेंची भेट

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 09 2018 10:08PMपारनेर : प्रतिनिधी

दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कन्या हर्षिता तसेच त्यांचे बंधू मनोज व सहकार्‍यांनी रविवारी सायंकाळी राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. केजरीवाल व त्यांचे सहकारी राळेगणसिद्धीत पोहचल्यानंतर त्यांनी राळेगणसिद्धीतील पाललोटक्षेत्र विकास, गबियन बंधारे, पाझर तलाव, शेततळी, मीडिया सेंटर, नापास मुलांची शाळा, पद्मावती परिसराची पाहणी केली. त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्रात त्यांनी हजारे यांची भेट घेतली. केजरीवाल व त्यांचे सहकारी तसेच अण्णा यांच्यात पर्यावरणाच्या र्‍हासाबाबत सखोल चर्चा झाली. पर्यावरणाच्या हानीमुळे नदीकाठच्या शहरांना निर्माण झालेला धोका, दिल्‍लीतील सध्याचे प्रदूषण, याचाही चर्चेदरम्यान उहापोह झाला. जगातील प्रदुषणाची समस्या दूर करण्यासाठी उच्चशिक्षित तरूणांनी पुढे येण्याची गरज आहे, आयआयटीमध्ये शिकणार्‍या तरूणांकडून मोठी अशा असल्याचे हजारे म्हणाले. शहरांबरोबरच खेड्यांचाही विकास झाला पाहिजे. गावांमध्ये पाणी आडवा, पाणी जिरवा ही संकल्पना राबवून गावातील पाण्याचा प्रत्येक थेंब अडविला गेला पाहिजे. वृक्षारोपन करून बिघडलेला समतोल दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवष्यकता हजारे यांनी यावेळी बोलून दाखविली.

तब्येतीची विचारपूस व हर्षदाची राळेगण वारी!

हजारे व केजरीवाल यांच्यात हजारे यांचे माजी स्वीय सहाय्यक सुरेश पठारे यांनी रविवारी सकाळी संभाषण करून दिले होते. त्यावेळी एकमेकांच्या तब्येतीची चौकशी झाली. आपण तब्येत ठिक आहे, आपणच आजारी असल्याचे माध्यमांमधून समजल्याचे हजारे यांनी केजरीवाल यांना सांगितल्यानंतर अलिकडेच बेंगलोर येथे उपचार घेतल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये निर्माण झालेला दुरावा या निमित्‍ताने काहीसा दूर झाला व सायंकाळीच केजरीवाल यांची मुलगी व भाऊ यांनी सहकार्‍यांसह राळेगणसिद्धीस भेट दिली.

अण्णांच्या पे्ररणेतून काम करणार : हर्षदा

अण्णांच्या कार्याविषयी तसेच त्यांच्या विचारांविषयी माझे बाबा मला नेहमी सांगत. आज त्यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याची संधी मिळाल्याने आपणास उर्जा मिळाली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेतून आपण दिल्‍लीत सामाजिक कार्य करणार असून अण्णांशी झालेल्या भेटीमुळे आपणास आनंद झाल्याचे हर्षदा केजरीवाल हिने माध्यमांशी बोलताना सांगितले.