Wed, Sep 26, 2018 14:10होमपेज › Ahamadnagar › तपासाची कागदपत्रे ‘सीआयडी’कडे

तपासाची कागदपत्रे ‘सीआयडी’कडे

Published On: May 22 2018 1:23AM | Last Updated: May 21 2018 10:38PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडाची मूळ कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी गुन्ह्याचे नूतन तपासी अधिकारी पुणे सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक अरुणकुमार सपकाळे हे सोमवारी (दि. 21) सायंकाळी नगरला दाखल झाले. गुन्ह्याचा तपास सुपूर्द करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

गुन्ह्याचे मावळते तपासी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्ह्याशी संबंधित मूळ कागदपत्रे व केसडायरी ‘सीआयडी’ पथकाच्या ताब्यात दिली आहेत. केडगाव हत्याकांडाचा तपास ‘सीआयडी’कडे सुपूर्द करण्याचा आदेश 16 मे रोजी काढण्यात आलेला आहे. सदर आदेश प्राप्त झाल्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलिस महासंचालकांच्या आदेशावरून पोलिस उपअधीक्षक अरुणकुमार सपकाळे यांची गुन्ह्याचे तपासी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

सपकाळे हे सोमवारी सायंकाळी त्यांच्या पथकासह नगरला दाखल झाले. त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांची भेट घेतली. त्यानंतर गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्याकडून गुन्ह्याशी संबंधित मूळ कागदपत्रे व केसडायरी ताब्यात घेतली. रात्री उशिरापर्यंत तपास सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू होती.