Sun, Jul 21, 2019 05:36होमपेज › Ahamadnagar › केडगाव दुहेरी हत्याकांड : कोतकरच्या मानसशास्त्रीय चाचण्यांसाठी अर्ज

केडगाव दुहेरी हत्याकांड : कोतकरच्या मानसशास्त्रीय चाचण्यांसाठी अर्ज

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 07 2018 11:02PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी नगरसेवक विशाल कोतकर याच्या पोलिस कोठडीतील जबाबाबाबत पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्याच्या मानसशास्त्रीय चाचणीसाठी काल (दि. 7) गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

कोतकर याने पोलिस कोठडीत असताना पोलिसांना सांगितले की, ‘गुंजाळ याला खून करण्यास सांगितले नव्हते, तर वाद मिटविण्यासाठी पाठविले होते.’ कोतकर याच्या जबाबात विसंगती येत आहे. त्यामुळे तपासात अडचणी येत आहेत. म्हणून गुन्ह्याचे तपासी अधिकारी पवार यांनी सोमवारी न्यायालयात अर्ज करून आरोपी कोतकर याची नार्को, लायडिटेक्शन, पॉलिग्राफ, ब्रेन मॅपिंग आदी मानसशास्त्रीय चाचण्या करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यावर आता न्यायालयाकडून आरोपीचे म्हणणे मागविले जाणार आहे. 

या गुन्ह्यातील आरोपी संदीप गुंजाळ याच्याही मानसशास्त्रीय चाचणीसाठीही पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. या हत्याकांडात नगरसेवक विशाल कोतकर व संदीप गुंजाळ यांचे जबाब महत्त्वपूर्ण असल्याने त्यांच्या नार्कोसह इतर चाचण्यांसाठी पोलिसांनी अर्ज केलेला आहे.

गुंजाळबाबत आज सुनावणीची शक्यता

आरोपी संदीप गुंजाळ याच्या मानसशास्त्रीय चाचणीवर सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र, आरोपी गुंजाळ हा नाशिक रोड कारागृहात आहे. तो सुनावणीसाठी हजर राहू शकला नाही. त्यामुळे ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे न्यायालयाकडून सुनावणी घेतली जाणार आहे. त्यावर काल काही होऊ शकले नाही. मंगळवारी (दि. 8) सुनावणी होण्याची शक्यता आहे.