Thu, Jun 27, 2019 18:36होमपेज › Ahamadnagar › कदमसह ११ शिवसैनिक शरण

कदमसह ११ शिवसैनिक शरण

Published On: May 30 2018 2:15AM | Last Updated: May 29 2018 11:40PMनगर : प्रतिनिधी

केडगाव येथील दगडफेक प्रकरणात आरोपी असलेले माजी शहरप्रमुख संभाजी कदम याच्यासह 11 जण काल (दि. 29) सकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांच्या अटकेची कार्यवाही पूर्ण करून दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांची जामीनावर सुटका केली.

शरण आलेल्यांमध्ये शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, अभिषेक भोसले, विशाल वालकर, सचिन शिंदे, आशा निंबाळकर, कुणाल ऊर्फ बंटी खैरे, सागर थोरात, प्रशांत गायकवाड, आदिनाथ जाधव, उमेश काळे, तेजस गुंदेचा यांचा समावेश आहे.

केडगाव येथे दगडफेक करून पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेले शिवसेनेचे 11 जण सकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात हजर झाले. वैद्यकीय तपासणी करून पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी आरोपींच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर सर्व 11 जणांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एस. पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी गुन्ह्याच्या तपास करणे, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी अटक केलेल्या 11 जणांना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. आरोपीचे वकील म्हणाले की, आरोपी पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झालेले आहेत. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची आवश्यकता नाही. 

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी सर्व 11 जणांच्या जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर आरोपींना जामीन मंजूर केला. जातमुचलक्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आरोपींची सुटका करण्यात आली.