Sun, Mar 24, 2019 10:54होमपेज › Ahamadnagar › केडगाव दगडफेक प्रकरण; हजर झालेल्या शिवसैनिकांना जामीन मंजूर

केडगाव दगडफेक प्रकरण; हजर झालेल्या शिवसैनिकांना जामीन मंजूर

Published On: May 19 2018 1:29AM | Last Updated: May 18 2018 11:41PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांवर झालेल्या दगडफेक प्रकरणातील आरोपी असलेले 15 शिवसैनिक काल (दि. 18) सकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी अटकेची प्रक्रिया पूर्ण करून दुपारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडीत सुनावली. त्यानंतर सायंकाळी जामीन मंजूर करून करण्यात आला. 

पोलिसांत हजर झालेल्यांमध्ये शिवसेना शहरप्रमुख दिलीप नानाभाऊ सातपुते, नगरसेवक विक्रम अनिल राठोड, दीपक साहेबराव खैरे, हर्षवर्धन महादेव कोतकर, रमेश रघुनाथ परतानी, सुनील अशोक सातपुते, देविदास भानुदास मोढवे, मुकेश नंदकुमार जोशी, विजय मोहनराव पठारे, संतोष धोंडिभाऊ फसले, चेमन मोहनलाल शर्मा, विशाल वसंत गायकवाड, शुभम संजय बेंद्रे, अनिल अर्जुन लालबोंद्रे, लंकेश नागाप्पा हरबा यांचा समावेश आहे. 

सकाळी 15 जण कोतवाली पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्यांच्या अटकेची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोलते यांच्यासमोर हजर करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील न्यायालयात म्हणाले की, आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींची नावे निष्पन्न करायची आहेत. आरोपींनी घटनास्थळी येण्यासाठी वापरेली वाहने हस्तगत करायची आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत आरोपींकडून गुन्हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण केला जाऊ शकतो. त्यामुळे सखोल तपासाची आवश्यकता आहे. म्हणून आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी.

आरोपींचे वकील अ‍ॅड. शशिकांत रकटे व अ‍ॅड. अनिल कवडे यांनी आरोपींच्या बचावाचा प्रयत्न केला. आरोपींच्या पोलिस कोठडीसाठी दिलेली कारणे समर्पक नसून, त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी सुनाविल्यानंतर तातडीने सर्व आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने सर्व आरोपींना 25 हजार रुपयांचा वैयक्तीक जातमुचलका अथवा प्रत्येकी दोन जामीनदार, या अटीवर जामीन मंजूर केला. जामिनानंतरची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सायंकाळी सर्वांची सुटका करण्यात आली. सकाळी पोलिस ठाण्यात हजर झालेले शिवसैनिक सायंकाळी घरी परतले.