Tue, Mar 26, 2019 11:42होमपेज › Ahamadnagar › केडगाव हत्यांकांड : उज्ज्वल निकम यांची नियुक्‍ती करावी!

केडगाव हत्यांकांड : उज्ज्वल निकम यांची नियुक्‍ती करावी!

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 27 2018 11:30PMनगर : प्रतिनिधी

केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्यांकांड प्रकरणाच्या खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्‍ती करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आल्याची माहिती शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी ‘पुढारी’शी बोलतांना दिली. बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने काल (दि.27) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना मागणीचे निवेदन दिले.

राजकीय वादातून केडगाव येथे संजय कोतकर व वसंत ठुबे यांची 7 एप्रिल रोजी हत्या करण्यात आली. या प्रकरणात आ.शिवाजीराव कर्डिले, आ.संग्राम जगताप, नगरसेवक विशाल कोतकर, भानुदास कोतकर यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल आहेत. त्यातील 10 जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत सुरु असून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्याची तयारी सुरु झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर काल शिवसेना पदाधिकार्‍यांनी बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिवसैनिकांच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सरकारतर्फे न्यायालयात सक्षमपणे बांजू मांडली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे या खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्‍ती करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

यावेळी महापौर सुरेखा कदम, उपमहापौर अनिल बोरुडे, सभागृह नेते गणेश कवडे, माजी सभागृह नेते अनिल शिंदे, दत्तात्रय मुदगल, सुरेश तिवारी, अनिल लोखंडे, संभाजी कदम आदी उपस्थित होते.