Wed, Jun 26, 2019 11:24होमपेज › Ahamadnagar › केडगाव दुहेरी हत्याकांड : ‘सीआयडी’ला प्रतीक्षा फॉरेन्सिक अहवालाची

केडगाव दुहेरी हत्याकांड : ‘सीआयडी’ला प्रतीक्षा फॉरेन्सिक अहवालाची

Published On: Jul 16 2018 1:25AM | Last Updated: Jul 15 2018 11:27PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात तांत्रिक पुराव्यांवर अधिक जोर देण्यात आलेला आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या बाबींचे नमुने तपासणीसाठी ‘फॉरेन्सिक लॅब’कडे पाठविलेले आहेत. त्याचे अहवाल अजून ‘सीआयडी’ला प्राप्त झालेले नाहीत. ते प्राप्त झाल्यानंतर पुरवणी दोषारोपपत्रात त्याचा समावेश करण्यात येईल. 

मयतांच्या मृतदेहाच्या एक्स रे, अटक केलेल्या आरोपींचे डीएनए आदी बाबीं तपासल्या जाणार आहेत. गुन्ह्याचा सुरुवातीला तपास करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी याबाबतचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठविले आहेत. त्याबाबतचा पत्रव्यवहार दोषारोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेला आहे. ‘फॉरेन्सिक’कडून त्याबाबत अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त झाल्यानंतरच ‘सीआयडी’कडून त्याचे विश्‍लेषण करण्यात येईल.

त्या आधारे न्यायालयात आरोपींविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. मात्र, ते न्यायालयात फितूर होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांवर जोर दिला आहे. प्राथमिक दोषारोपपत्रात आरोपींच्या कटाची साखळी जुळविण्यासाठी मोबाईल कॉल डिटेल्स व संभाषणाचा आधार घेण्यात आला आहे. इतर पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिकचा आधार घेण्यात आला आहे. जे व्हिडिओ व इतर इलेक्ट्रानिक पुरावे दोषारोपपत्रात आहेत, त्याला भारतीय पुरावा कायदा कलम 65 (ब) चे प्रमाणपत्र जोडण्यात आलेले आहेत. तांत्रिक पुराव्यांवर आधारलेली ही केस साक्षीदारांवर जास्त अवलंबून राहणार नाही.

आतापर्यंत 106 साक्षीदारांची पडताळणी

केडगाव दुहेरी हत्याकांडात साक्षीदार, पंच, यापूर्वीचे तपासी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी अशा एकूण 106 साक्षीदारांची पडताळणी करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याच्या तपासात घटनेची माहिती देणार्‍या साक्षीदारांपेक्षा तांत्रिक पुराव्यांवरच अधिक जोर देण्यात आल्याचे दिसून येते.