Wed, Apr 24, 2019 20:00होमपेज › Ahamadnagar › केडगाव दुहेरी हत्याकांड : हत्याकांडाचा व्हिडिओ पोलिसांकडे!

केडगाव दुहेरी हत्याकांड : हत्याकांडाचा व्हिडिओ पोलिसांकडे!

Published On: Jul 12 2018 1:39AM | Last Updated: Jul 11 2018 10:19PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडातील मयत झालेल्या एकाचा गळा कापतानाचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याचा दोषारोपपत्रात समावेश केला असून, हा व्हिडिओ हत्याकांडात महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे. काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाबही दोषारोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

पोटनिवडणुकीतील निकालानंतर राजकीय वादातून केडगावात शिवसैनिक संजय कोतकर व वसंत ठुबे या दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हा खून फक्त संदीप गुंजाळ ऊर्फ डोळसे यानेच केला की त्याला आणखी साथीदार होते, असा प्रश्‍न सुरुवातीला पोलिसांना पडला होता. परंतु, चौकशीनंतर गुंजाळ यानेच दोघांना गोळ्या घालून व गळे कापून खून केला. त्यावेळी महावीर मोकळे, संदीप गिर्‍हे हे दोघे तिथे उपस्थित होते. खुनानंतर गुंजाळ हा गिर्‍हे व मोकळे यांच्यासमवेत घटनास्थळावरून पसार झालेला आहे, असे तपासातून निष्पन्न झालेले आहे. 

संदीप गुंजाळ ऊर्फ डोळसे हा जखमी अवस्थेतील एकाचा खून करतानाचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. त्या व्हिडिओची सीडी कोणीतरी निनावी पत्राद्वारे नगर पोलिसांना सादर केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी त्या सीडीचा पंचनामा करून मुद्देमाल म्हणून ती जप्त केली आहे. 700 एम. बी. च्या या व्हिडिओत एक लाल रंगाचा हाफ बाह्यांचा टी शर्ट व मिलेट्री रंगाची फूल पँट असलेला इसम पाठमोर्‍या स्थितीत खाली पडलेल्या जखमी इसमाचा धारदार शस्त्राने गळा कापत असताना दिसत आहे. तसेच सुरुवातीला रवींद्र खोल्लम याच्या घरासमोर येऊन थांबलेल्या व्यक्तीनेच संजय कोतकर व वसंत ठुबे या दोघांची बंदुकीतून गोळ्या घालून व जखमी झालेल्या संजय कोतकर यांचा गळा चिरून हत्या करताना पाहिलेले आहे. ही व्यक्तीच संदीप गुंजाळ आहे. त्यामुळे निनावी पत्रासह पोलिसांना मिळालेली सीडी व काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हे केडगाव दुहेरी हत्याकांडात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहेत.

तांत्रिक पुरावा ठरणार महत्त्वाचा

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार न्यायालयात फितूर झाले, तरी दोषारोपपत्रात ‘सीआयडी’ने नमूद केलेला घटनाक्रम व त्या क्रमानुसार झालेले मोबाईल कॉल्स, गळा कापतानाचा व्हिडिओ हे तांत्रिक मुद्दे केडगाव दुहेरी हत्याकांडात महत्त्वाचे पुरावे ठरणार आहेत. इलेक्ट्रिानिक पुराव्याच्या सत्यतेबाबत भारतीय पुरावा कायदा कलम 65 (ब) चे प्रमाणपत्र दोषारोपपत्रात जोडण्यात आलेले आहे.