Mon, Apr 22, 2019 16:01होमपेज › Ahamadnagar › केडगाव पोटनिवडणुक : भाजप उमेदवार वार्‍यावर!

केडगाव पोटनिवडणुक : भाजप उमेदवार वार्‍यावर!

Published On: Apr 07 2018 1:41AM | Last Updated: Apr 07 2018 12:45AMनगर : प्रतिनिधी

काँग्रेस व शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या केडगाव पोटनिवडणुकीसाठी काल (दि.6) उत्स्फुर्त मतदान झाले. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेना नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी दोनही मतदान केंद्रांवर तळ ठोकलेला असतांना भाजपच्या नेत्यांनी मात्र या निवडणुकीकडे सपशेल पाठ फिरवत उमेदवाराला वार्‍यावर सोडल्याचे चित्र आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा ठोकणार्‍या भाजपला मतदान केंद्रावर साधे बुथही उभारता न आल्याची चर्चा रंगली होती.

सहा ते आठ महिन्यांवर असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने विशाल कोतकर यांना उमेदवारी देत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. तर शिवसेनेने विजय पठारे यांना उमेदवारी देऊन सर्व शक्‍ती पणाला लावली. दुसरीकडे सेनेशी घटस्फोट घेवून भाजपाने महेश सोले यांच्या रुपाने स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवला. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक अखेर टप्प्यात रंगात आली. काल मतदानाच्या दिवशीही काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेना नेत्यांची केंद्रावर वर्दळ होती. आ. संग्राम जगताप, माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर, जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते आदींसह काँग्रेस व राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, तसेच शिवसेना उपनेते अनिल राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, अनिल शिंदे, सचिन जाधव आदींसह सर्व नगरसेवक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान केंद्रावर तळ ठोकून होत्या.

स्वबळाचा नारा देत आणि पोटनिवडणूकच काय, सार्वत्रिक निवडणुकाही स्वबळावर जिंकण्याची घोषणा देणार्‍या भारतीय जनता पार्टीने ऐन मतदानाच्या दिवशी उमेदवाराची साथ सोडल्याचे चित्र होते. महेश सोले हे एकटेच मतदान केंद्रांवर फिरत होते. शहर जिल्हाध्यक्षांसह केडगावातील भाजपचे कार्यकर्ते, महापालिकेचे नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी या मतदान केंद्रावर फिरकलेही नाहीत. विशेष म्हणजे मतदान केंद्रावर बूथ लावण्याची परवानगीही भाजपला मिळविता आली नसल्याने नेत्यांसह कार्यकर्तेही केडगावातून गायब झाल्याची चर्चा होती. 

दोन बूथ निवडणूक अधिकार्‍यांनी हटविले!

जगदंबा विद्यालय व शिवाजीनगर जिप विद्यालय या दोन मतदान केंद्रांवर 4 बूथसाठी प्रशासनाने परवानगी दिली होती. मात्र, जगदंबा विद्यालयाजवळ 2 अतिरिक्‍त बूथ उभारण्यात आले होते. त्याला काँग्रेसला 2 बूथला परवानग्या असल्याने 1 बूथ काढण्यात आला. तर भाजपाने परवानगीच घेतलेली नसल्याने तो बूथही प्रशासनाने हटविण्यास भाग पाडले.

सेना-राष्ट्रवादी समर्थकांमध्ये बाचाबाची!

शिवाजीनगर येथील मतदान केंद्रावर सर्वाधिक मतदान असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेना कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली होती. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची होऊन शिवसेना नगरसेवकाला शिविगाळ करण्याचाही प्रकार घडला. त्यामुळे पोलिस प्रशासनाने बंदोबस्तात वाढ केली होती.

 

Tags : Ahmednagar, Ahmednagar news, Kedgaon,  by election,