Tue, Mar 26, 2019 01:34होमपेज › Ahamadnagar › ‘केडगाव हत्याकांड’ अधिवेशनात मांडणार

‘केडगाव हत्याकांड’ अधिवेशनात मांडणार

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 21 2018 11:56PMनगर : प्रतिनिधी 

केडगावात शिवसैनिकांची हत्या करून दहशत माजविण्याचा डाव दिसून येत आहे. नगर जिल्ह्यात आम्हीच राज्य करावे, आमच्या साम्राज्याला कोणी भेदू नये, अशा अभद्र युतीचा कर्डिले-कोतकर-जगताप कुटुंबाचा दहशतीचा ‘नगर पॅटर्न’ आहे. केडगावात आजही दहशत असून, ठुबे-कोतकर कुटुंबीयांना स्वरक्षणासाठी पोलिसांनी शस्त्र परवाने द्यावेत. विधीमंडळाच्या अधिवेशनात केडगाव हत्याकांडाचा मुद्दा मांडणार असल्याची माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. डॉ.नीलम गोर्‍हे यांनी दिली.

केडगावात पोटनिवडणुकीच्या वादातून दि.7 एप्रिल रोजी शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती. या दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन  करण्यासाठी आ. गोर्‍हे या गुरुवारी (दि.21) केडगावात आल्या होत्या. यावेळी मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी पुणे शहर शिवसेनेतर्फे दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी 1-1 लाख रूपयांची मदत देण्यात आली. गोर्‍हे यांनी मयत संजय कोतकर यांच्या पत्नी सुनीता कोतकर, मुलगा संग्राम कोतकर तसेच वसंत ठुबे यांची पत्नी अनिता ठुबे यांची भेट घेऊन विचारपूस करून 1 लाखांचा मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी अनिता ठुबे हिने केडगावात दहशत असून, एकही प्रत्यक्ष साक्षीदार पुढे आला नसल्याचे सांगून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली.यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, उपशहरप्रमुख रमेश परतानी, नगरसेवक योगीराज गाडे, पुणे शहर शिवसेनेचे उपशहरप्रमुख आनंद गोयल, शिवसहकार सेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब भांडे, राजेंद्र धनकुडे, सचिन खांदवे आदी उपस्थित होते.