Sun, Nov 18, 2018 07:11होमपेज › Ahamadnagar › केडगाव हत्याकांड: चौघांच्या आवाजाचे नमुने घेणार

केडगाव हत्याकांड: चौघांच्या आवाजाचे नमुने घेणार

Published On: Aug 21 2018 1:30AM | Last Updated: Aug 20 2018 8:59PMअहमदनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडापूर्वी आरोपींमध्ये झालेले मोबाईल संभाषण हा गुन्ह्यात महत्त्वाचा पुरावा होता. त्यामुळे चार आरोपींच्या आवाजाचे नमुने घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ‘सीआयडी’ने केली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोनल पाटील यांनी त्यांच्या आवाजाचे नमुने घेण्यास सोमवारी (दि. १०) परवानगी दिली आहे. 

न्यायालयाच्या निर्णयामुळे नाशिक कारागृहात असलेले आरोपी संदीप गुंजाळ, भानुदास महादेव ऊर्फ बीएम कोतकर, संदीप गिर्‍हे, नगरसेवक विशाल कोतकर या चौघांच्या आवाजाचे नमुने ‘सीआयडी’कडून घेतले जातील. गुन्ह्याच्या तपासात मोबाईलवर संभाषणाचे रेकॉर्डिंग हस्तगत केले आहे. हा गुन्ह्यात महत्त्वाचा पुरावा आहे. त्यामुळे आवाजाचे नमुने घेणे आवश्यक आहे. म्हणून आरोपींच्या आवाजाचे नुमने घेण्यास परवानगी देण्याची मागणी ‘सीआयडी’ने केली होती. त्याला आरोपीचे वकील ऍड. सतीश गुगळे यांनी आक्षेप घेतला होता. आरोपी पोलिस कोठडीत असताना नमुने घ्यायला हवे होते. गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलेले आहे. आता नमुने मागवून तपासातील चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आरोपींच्या आवाजाचे नमुने घेण्यास परवानगी देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद ऍड. गुगळे यांनी केला होता. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने ‘सीआयडी’ची मागणी मान्य करून आरोपींच्या आवाजाचे नमुने घेण्यास परवानगी दिली आहे.