Tue, Jul 23, 2019 17:01होमपेज › Ahamadnagar › केडगाव आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत!

केडगाव आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत!

Published On: May 18 2018 1:13AM | Last Updated: May 17 2018 10:55PMनगर : मुरलीधर तांबडे

बालकांसह गरोदर माता व गोरगरीब रुग्णांना वैद्यकीस सुविधा देण्यासाठी लाखो रुपये खर्चून महापालिकेने केडगावातील मोतीबाग उपनगरात अद्ययावत असे नागरी आरोग्य केंद्र उभारले आहे. आरोग्य केंद्राचे काम पूर्ण होऊन तीन  महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापि हे केंद्र सुरू करण्यात आले नाही. महापालिकेच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष व राजकीय साठेमारीत आरोग्य केंद्राचे उद्घाटन रखडल्याने रुग्णांसह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले आहेत. 

केडगावची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. जवळपास 70 हजारांच्यावर लोकसंख्या गेली आहे. महापालिकेच्या हद्दीत राहणार्‍या नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. मात्र, मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित आहेत. केडगाव येथील मनपाच्या उपकार्यालयातील एका खोलीत आरोग्यकेंद्र आहेत. उपनगरातील गरोदर मातांची तपासणी व लहान बालकांचे याठिकाणी लसीकरण केले जाते. दर सोमवारी लसीकरण व गुरुवारी गरोदर मातांची तपासणी होत असल्याने याठिकाणी मोठी गर्दी होते. मात्र, जागा अपुरी असल्याने गरोदर महिलांसह बालकांना बाहेर तिष्ठत उभे रहावे लागत आहे. सध्या उन्हाचा पारा चाळीशी पार गेला आहे.  उन्हाच्या तडाख्याने हाल होत आहे. त्यातच या केंद्रात मोठ्या प्रमाणात औषध साठा ठेवल्याने बसायला जागा शिल्लक राहिली नाही. रुग्णालयात टेबल, खुर्च्या, लसीचा साठा  ठेवणासाठी असणारे मशीन, याशिवाय व्हॅक्सीन कॅरियर (लस ठेवतात ते बॉक्स) असे साहित्य आहे. या साहित्यामुळे बसण्यास जागा अपुरी पडते. त्यातच खोकला, ताप, उलटी यासह विविध साथजन्य आजार झाल्यास औषधोपचारासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. 

वाढती लोकसंख्या, आरोग्य केंद्राची अपुरी जागा, रुग्णांची गर्दी याचा विचार करता माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेने मोतीबाग येथील जागेमध्ये सुमारे 52 लाख रुपये खर्चून सर्वसुविधांनी युक्त असे नागरी आरोग्य केंद्र उभारले आले. काम सुरू झाल्यानंतर कधी बंद, तर कधी सुरू या खेळात अखेर गेल्या तीन महिन्यांपूर्वी हे काम पूर्ण झाले. मोतीबाग येथे  नागरी आरोग्य केंद्राची दुमजली इमारत असून, यात एक प्रसूतिगृह, लसीकरणाची सुविधा, औषधसाठा, पिण्याच्या पाण्यासाठी दोन कुलर, सौलर सुविधा, गप्पी माशांसाठी हौद यासह अन्य सुविधा आहेत. या आरोग्य केंद्रामुळे गरोदर माता, लहान बालके व रुग्णांचा त्रास कमी होणार आहे. याठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता, चार परिचारिका, दोन शिपाई, ऑन कॉल स्त्रीरोगतज्ज्ञ अशी पदे आहेत.
नागरी आरोग्य केंद्रातील सर्व कामे पूर्ण झाले असून, केवळ वीजजोडणीचे काम बाकी राहिले आहे. शिवाय हा परिसर मोठा असून, रुग्णांसह येणार्‍या नागरिकांना बसण्यास मोठी जागा उपलब्ध होणार आहे.त्यामुळे केडगाव उपकार्यालयातील हे केंद्र तातडीने मोतीबाग येथीन नवीन इमारतीत स्थंलातर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.