Sun, Apr 21, 2019 13:47होमपेज › Ahamadnagar › केडगाव दगडफेक प्रकरण; शिवसैनिकांची रवानगी पोलिस कोठडीत

केडगाव दगडफेक प्रकरण; शिवसैनिकांची रवानगी पोलिस कोठडीत

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 07 2018 10:46PMनगर : प्रतिनिधी

केडगाव येथे पोलिसांवर दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील भादंवि 308 वगळल्यानंतर नगरसेवकासह 9 जण काल (दि. 7) कोतवाली पोलिस ठाण्यात हजर झाले. दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आला आहे.

दुहेरी हत्याकांडानंतर केडगावात सुमारे 4-5 तास पोलिसांना वेठीस धरून त्यांच्यावर दगडफेक, धक्काबुक्की करून वाहनांची तोडफोड केली होती. तसेच मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी शिवसेना उपनेते माजी आ. अनिल राठोडसह साडेपाचशे ते सहाशे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दबावापोटी या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली जात नव्हती. गुन्ह्यातील गंभीर कलम वगळल्यानंतर शिवसैनिकांना दिलासा मिळाला होता.

त्यामुळे सोमवारी (दि. 7) दुपारी शिवसेनेचे नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे, रावजी बाळाजी नांगरे (रा. साईबन कॉलनी, भिस्तबाग, सावेडी), प्रफुल्ल साळुंके (रा. भूषणनगर, केडगाव), गिरीष राजेंद्र शर्मा (रा. अजिंक्य कॉलनी, भूषणनगर), सुनील गोपाल वर्मा (रा. सातपुते गल्ली, केडगाव), अमोल शिवाजी येवले (रा. केडगाव), अभिजित शशिकांत राऊत (रा. केडगाव), दत्तात्रय तुकाराम नागापुरे (रा. नगर), राजेश वैजिनाथ सातपुते (रा. केडगाव) हे गुन्ह्यातील 9 आरोपी कोतवाली पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांच्या अटकेची कार्यवाही केली.

अटक केलेल्या आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एस. पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले. पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. ते म्हणाले की, केडगाव हत्याकांडानंतर आरोपींनी परिसरात दगडफेक करून लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान केले आहे. गुन्ह्यातील अनेक आरोपी फरार असून, त्यांचा शोध घ्यायचा आहे. जमावातील अज्ञात व्यक्तींची नावे निष्पन्न करायची आहेत.

गुन्हा करण्यामागचा नेमका हेतू काय होता, याचा तपास करायचा आहे. खुनासारखी गंभीर घटना घडलेली असताना आरोपींनी 6 ते 7 तास पंचनामा व मृतदेहाची उत्तरीय तपास करण्यास विरोध केलेला आहे. आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली असून, प्रशासनालाही वेठीस धरलेले आहे. त्यामुळे गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी.आरोपींच्या वकिलांनी बचावाचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींना बुधवारपर्यंत (दि. 9) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.