Tue, Jan 22, 2019 06:27होमपेज › Ahamadnagar › केडगाव दुहेरी हत्याकांड : आमदार जगतापांचा जामीन अर्ज मागे नाही

केडगाव दुहेरी हत्याकांड : आमदार जगतापांचा जामीन अर्ज मागे नाही

Published On: May 24 2018 1:31AM | Last Updated: May 23 2018 11:20PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी दाखल केलेला जामीन अर्ज अजून मागे घेण्यात आलेला नाही. काल (दि. 23) या अर्जावरील सुनावणीची तारीख होती. दरम्यान, न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी भानुदास कोतकर यानेही जामीनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. त्यावर गुरुवारी (दि. 24) सुनावणी ठेवण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी न्यायालयीन कोठडीत असताना नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. ‘जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही. तोपर्यंत जामीन घेणार नाही, असे आ. जगताप यांनी कळविलेले आहे. त्यांनी अर्ज मागे घेण्यास सांगितलेले आहे’, असे आरोपीच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना सांगितलेले होते. प्रत्यक्षात अजूनही आ. संग्राम जगताप यांचा जामीन अर्ज मागे घेण्यात आलेला नाही. मागील सुनावणीची तारीख 14 मे होती. बुधवारीही (दि. 23) या अर्जावर सुनावणी होती, असे न्यायालयाच्या संकेतस्थळावर नमूद आहे. म्हणणे सादर केले नसल्याचे त्या संकेतस्थळावरून आढळून येते. 

आ. जगताप यांनी अर्ज मागे घेत असल्याचे प्रसारमाध्यमे व नागरिकांत पसरवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. अर्ज मागे घेणार असल्याचे आरोपीचे वकील सांगत होते, तरीही अर्ज मागे का घेण्यात आला नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. भानुदास कोतकर याचाही जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे. कोतकर हा सध्या नगरच्या उपकारागृहात आहे. तर आ. संग्राम जगताप हा औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात आहे.