Tue, May 21, 2019 04:51होमपेज › Ahamadnagar › विज्ञानाने अंधश्रद्धा दूर करा : काळे

विज्ञानाने अंधश्रद्धा दूर करा : काळे

Published On: Dec 24 2017 1:42AM | Last Updated: Dec 23 2017 10:51PM

बुकमार्क करा

कोळपेवाडी : वार्ताहर 

एकीकडे बुद्धीच्या बळावर वैज्ञानिक क्षेत्रात मानवाने साधलेल्या अचाट प्रगतीचे चित्र दिसत असताना दुसरीकडे समाजात मात्र अध्यात्माच्या नावाखाली दिवसेंदिवस वाढत चाललेली अंधश्रद्धा असे चित्र दिसते. त्याचे घातक परिणाम देशाच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करीत आहे. हे चित्र बदलून टाकण्यासाठी भावी वैज्ञानिकांनी विज्ञानाच्या साह्याने समाजातील अंधश्रद्धा दूर करावी, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष  आशुतोष काळे यांनी केले.

पंचायत समिती व विज्ञान, गणित अध्यापक संघाच्यावतीने कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी-सुरेगाव येथील श्री. छत्रपती शिवाजी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात 43 वे विज्ञान, गणित व लोकसंख्या शिक्षण प्रदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन काळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, सुधाकर दंडवते, विमल आगवन, उपसभापती अनिल कदम, सदस्य  गटनेते अर्जुन काळे, मधुकर टेके, पोर्णिमा जगधने, गटविकास अधिकारी कपिल कलोडे, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख उपस्थित होते.

काळे म्हणाले की, कोपरगाव तालुक्यातील शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता किती ठासून भरलेली आहे हे आजच्या प्रदर्शनातून जाणवत आहे. भविष्यात विज्ञानाचे आव्हान पेलण्याची ताकद व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची दूरदृष्टीची अनुभूती या प्रदर्शनातून येत असल्याचे सांगितले. देशाचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ स्व. डॉ. अब्दुल  कलाम यांनी आपला देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या भावी वैज्ञानिकांनी आपल्या असामान्य बुद्धीचा उपयोग आपल्या देशाला जगात महासत्ता बनविण्यासाठी करावा, असे आवाहन केले.

परजणे म्हणाले, या भावी विद्यार्थ्यांमध्ये जर आपण आपले उद्याचे भविष्य या दृष्टीकोनातून पाहत असताना अशा उपक्रमांसाठी जिल्हा परिषद स्तरावर जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करीत असून यापूर्वी पंचायत समितीच्या माध्यमातून दिला जाणारा निधी मागील काही वर्षांपासून बंद करण्यात आला आहे. तो पूर्ववत  सुरू व्हावा, यासाठी प्रयत्न करावेत.

यावेळी कारभारी  आगवन, राहुल रोहमारे, काळे कारखान्याचे संचालक सुनील शिंदे,  सुरेगावचे सरपंच वाल्मिक  कोळपे, प्राचार्य मते एन. ए., प्राचार्या ज्योती देवरे, मुख्याध्यापक राजेंद्र  पाचोरे उपस्थित होते. प्रास्ताविक  गटशिक्षणाधिकारी  शबाना शेख यांनी केले. स्वागत प्राचार्य मते यांनी केले. 

सूत्रसंचालन राजश्री पिंगळे यांनी केले, तर आभार एस. डी.सातव यांनी मानले.