Thu, Jun 20, 2019 00:31होमपेज › Ahamadnagar › उडीद केंद्रावर शेतकर्‍यांच्या लागल्या रांगा

उडीद केंद्रावर शेतकर्‍यांच्या लागल्या रांगा

Published On: Dec 14 2017 1:43AM | Last Updated: Dec 13 2017 11:07PM

बुकमार्क करा

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यात कर्जत आणि मिरजगाव या दोन उडीद खरेदी केंद्रांवर हमी भावाने खरेदीच्या काल (दि. 13) अखेरच्या दिवशी शेतकर्‍यांची मोठी रांग लागली होती. तालुक्यात आजही सुमारे 5 हजार शेतकर्‍यांचा 35 हजार क्विंटल पेक्षा जास्त उडीद शिल्लक आहे. रात्री 12 नंतर उडीद आणि मुगाची खरेदी बंद होणार आहे. त्यामुळे माल शिल्लक असलेले शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. शिल्लक उडदाचे करायचे काय, असा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर आहे. 

सरकारी आकडेवारीनुसार तालुक्यामध्ये 22 हजार हेक्टरवर उडीद पेरणी झाली. प्रत्यक्षात 53 ते 54 हजार एकर उडीद होता. सरकारने उडीद खरेदीसाठी शेतकर्‍यांची ऑनलाईन नोंदणी करून नंतर मेजेस आल्यावर खरेदी केद्रांवर जाण्याची योजना आखली. मात्र मध्यंतरीच्या पावसामुळे उडीद भिजून प्रतवारी घसरली. त्यातच शासनाचे सर्व नियोजन कोलमडून पडले. कर्जत येथील बगवाडी सेवा संस्थेच्या खरेदी केंद्रावर जवळपास 8 हजार शेतकर्‍यांनी उडीद विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. हे केंद्र 20 ऑक्टोबर रोजी सुरू झाले. या केंद्रावर जवळपास 20 ते 21 हजार क्विंटल उडीद खरेदी झाला आहे. उर्वरित सर्व शेतकर्‍यांचा उडीत तसाच राहिला आहे.

केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा शासनाने उडीद खरेदीसाठी 60 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे आज हा उडीद आणि मूग खरेदीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून खरेदी केंद्रावर गर्दी होत होती. आज मात्र शेतकरी आणि वाहनांची विक्रमी गर्दी कर्जतच्या केंद्रांवर होती. शेतकर्‍यांनी उडीद आणलेले ट्रॅक्टर, टेम्पो, पिकअपसह विविध वाहनांची दोन कि. मी. पर्यंत रांगा लागल्या होत्या. वाहनांमधून माल उतरवून खाली घेतलेला उडीद मोठ्या प्रमाणात गोण्यांमध्ये केंद्राच्या दरवाजाजवळ पडला होता. 

शेतकर्‍यांनी सांगितले की, ते 3 ते 4 दिवसांपासून येथे थांबलेले आहेत. मात्र तरीही उडीद घेतला गेला नाही. साहेब शेतकर्‍यांना कोणी वाली नाही काय हो, अशी आर्त हाक त्यांनी पत्रकारांशी बोलताना घातली. उडीदासाठी वेगळा नियम का? तूर आणि मक्यासाठी नाफेड 90 दिवस खरेदी केंद्र सुरू ठेवते. तशी परवानगी आहे. मात्र उडदासाठी अवघा 60 दिवसांचा अवधी आहे. उडदासाठी असा वेगळा नियम का?