Fri, Aug 23, 2019 23:32होमपेज › Ahamadnagar › कर्जतच्या आगाराचे भिजत घोंगडे कायम

कर्जतच्या आगाराचे भिजत घोंगडे कायम

Published On: Jul 31 2018 1:28AM | Last Updated: Jul 31 2018 12:19AMकर्जत : गणेश जेवरे

एसटी 70 वर्षांची झाली असली तरी कर्जत आगाराचे चाक मात्र अद्याप रूतलेले असून भाजपच्या अगोदर असलेल्या जनसंघ या पक्षाच्या येथील स्थानिक नेत्यांनी 58 वर्षांपूर्वी म्हणजे सन 1960 साली कर्जत येथे एसटी डेपो व्हावा यासाठी आंदोलन केले होते, त्यांची स्वप्नपूर्ती केव्हा होणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पहिले आंदोलन आणि सरकार

कर्जतमध्ये पहिली एसटी सन 1956 साली आली. त्यावेळी नगर ते कर्जत आणि खर्डा ते दौंड अशा दोन गाड्या येत असत. यामध्ये नगर-कर्जत गाडीला टपाल गाडी म्हणत. पूर्वी एसटी गावात येणार असेल तर सर्व गाव जमा होत असे. गावातील कोणी एसटीने आले तर त्याची 8 दिवस गावांमध्ये चर्चा होत होती. हा काळ संपला आणि तालुक्याचा विकास होण्यासाठी तालुक्यातील जनसंघाचे तत्कालीन नेते पोपट देसाई, कै.पोपटभाऊ कुलथे व कै. शिवदास कानडे यांनी सन 1960 साली कर्जत येथे एसटी डेपो व्हावा या मागणीसाठी त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. आज या घटनेला 58 वर्षे झाली तरी हा प्रश्‍न तसाच आहे. पूर्वीचा जनसंघ आणि आत्ताचा भाजप हे दोन्ही पक्ष एकच आहेत. या पक्षाचे आज देशात व राज्यात सरकार आहे. शिवाय राज्याचे मंत्रीपद आहे. यामुळे हा प्रश्‍न सुटलाच पाहिज,े अशी तालुक्यातील जनतेची अपेक्षा आहे. जर सरकार असूनही प्रश्‍न सुटत नसतील तर मग मंत्री यांनी स्वतः चे पद पणास लावावे असा जनतेचा आवाज आहे.

डेपोला मुहूर्त कधी लागणार

कर्जतला एसटी डेपो होणार..होणार....नक्की होणार अशा घोषणा अनेक पिढ्या ऐकतच आहेत. मात्र प्रत्यक्षात अद्याप तरी या प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही. कर्जत  हे नगर जिल्ह्यातील एकमेव तालुक्याचे ठिकाण असे आहे कि जिथे एसटीचे आगार नाही. यामुळे तालुक्यातील विकासाला मोठा अडसर झाला आहे.तालुक्यातील आजही अनेक गावे अशी आहेत की जिथे एसटी जात नाही. यामुळे ही गावे अद्यापही वंचित राहिलेली आहेत.

घोषणा आणि आश्वासने

कर्जत येथे एसटीचे आगार होणार अशी घोषणा अनेक वेळा झाली आहे.कर्जतच्या एसटी डेपोसाठी मंत्रालयात अनेक बैठका देखील झाल्या. कधी मिनी एसटी डेपो होणार असे जाहीर होते तर कधी फक्त दहा जादा गाड्या देण्याची घोषणा होते. कधी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे सांगितले जाते तर कधी कुठला तरी बंद डेपो येथे हलविणार असल्याची घोषणा होते मात्र, केवळ आणि केवळ घोषणा आणि आश्वासनेच कर्जतकरांच्या नशिबी येत आहेत. 

उद्घाटने आणि कोनशिला अडगळीत 

राज्यात सन 1995 साली युतीचे सरकार होते, त्यावेळी तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेसह अनेक मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांचे उपस्थितीमध्ये डेपोचे भूमिपूजन झाले. कोनशिला बसवण्यात आली. नंतर अनेक महिन्यांनी डेपोच मंजूर नसल्याचे बातम्या वृत्तप्रसिद्ध होवू लागताच कोनशिला काढून आणून बसस्थकाच्या येथील एका अडगळीच्या खोलीत ठेवून देण्यात आली. त्याप्रमाणे कर्जतचा डेपो देखील अडगळीत पडला आहे. यांनतर बससथानकावर ‘बांधा वापरा आणि हस्तांतर करा’ या योजने अंतर्गत येथे शॉपिंग कॉम्पलेक्स होणार होते. त्याचा भूमिपूजनाचा मोठा कार्यक्रम झाला. त्यावेळी  पण डेपोची घोषणा करण्यात आली मात्र डेपो अद्याप झाला नाही आणि कॉम्प्लेक्स पण झाले नाही.