Sun, Apr 21, 2019 02:23होमपेज › Ahamadnagar › ..अन्यायाचा प्रवास अखेर आरोपींच्या शिक्षेने थांबला

..अन्यायाचा प्रवास अखेर आरोपींच्या शिक्षेने थांबला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कर्जत : प्रतिनिधी

देशामध्ये गाजलेल्या कोपर्डी येथील अत्याचार प्रकरणाचा निकाल अखेर लागला. कोपर्डीकरांसह सर्वत्र न्यायाचा आनंद साजरा करण्यात आला. तिघांनाही फाशी सुनावण्यात आल्याने निर्भयाला अखेर न्याय मिळाला. एका अन्यायाचा प्रवास शिक्षेने थांबला.

कोपर्डी येथील अल्पवयीन खेळाडू असलेल्या निर्भयाचा अत्याचार करून तिचा निर्घून खून करण्यात आला होता. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटले होते. या गुन्ह्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कोपर्डी ग्रामस्थ आणि निर्भयाचे नातेवाईक नगर येथे निकाल ऐकण्यासाठी गेले होते. गावामध्ये काही मंडळी होती. आजही ग्रामस्थांनी गावामध्ये सर्व व्यवहार निकाल लागेपर्यंत बंदच ठेवले होते. निर्भयाच्या आई-वडिलांनी सकाळीच ग्रामदैवताचे दर्शन घेतले आणि निकालासाठी साकडे घातले होते. निर्भयाच्या स्मारका जवळ जाऊन प्रार्थना केली.

तुला न्याय घेऊनच परत येऊ, असे साश्रू नयनांनी सांगत नगरचा रस्ता धरला. निघताना निर्भयाच्या वडिलांचे वाहन लवकर सुरू होत नव्हते. त्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचकली होती... त्यांनी पुन्हा स्मारकाला नमस्कार केला आणि गाडीमध्ये बसले. नंतर गाडी सुरू झाली आणि ते गाडी घेऊन नगरच्या दिशेने गेले. जणू निर्भया त्यांना म्हणत होती, आज तरी मला न्याय घेऊनच याल ना...गावामध्ये वीज गायब कोपर्डी गावामध्ये दिवसभर वीज गायब होती.

त्यामुळे गावातील टिव्ही संच बंद होते. अनेकांनी मोबाईलचा आधार घेतला. मात्र या गावामध्ये सर्वच कंपन्यांचे नटवर्क कमी असल्याने अडचण होत होती. निकालाकडे सर्वाचे लक्ष लागलेले... गावातील काही प्रमुख मंडळी गावातील भैरवनाथ मंदिरासमोर नामस्मरण करीत बसली होती. गावातील जिल्हा परिषदेच्या व निर्भया शिकत असलेल्या कुळधरण येथील शाळेत सर्व विद्यार्थी निर्भयाला न्याय मिळावा म्हणून प्रार्थना करीत होते.

घड्याळाचा काटा पुढे सरकत नव्हता आजचा दिवस कोपर्डीकरांच्या जीवनातील महत्वाचा दिवस होता. ज्या गावात कधी भांडण-तंंटा होत नाही, तेथे एखादा खून तर खूप दूरची गोष्ट होती.अशा या आदर्श कोपर्डी गावाच्या इतिहासात काळीकुट्ट घटना घडली.. गावातील एका निरागस, खेळकर निर्भयावर अनन्वीत अत्याचार झाले. तिचा खून करण्यात आला. या घटनेने गावातील केवळ माणसेच नाही तर माती देखील कंप पावली होती. या घटनेचा निकाल लागणार असल्याने गावातील प्रत्येक जण सकाळपासून नित्याचे कामे उरकून अकरा वाजण्याची वाट पहात होता. मात्र आज घड्याळाला काय झाले होते कोणास ठावूक? काटा सरकता पुढे सरकत नव्हता. प्रत्येक मिनीट तासाप्रमाणे वाटत होता. प्रत्येकाचे मोबाईलकडे लक्ष होते. कधी अकरा वाजतात आणि कानावर फाशी झाल्याचे शब्द पडतात.. असे झाले होते. 

आनंद व संयमाने निकाल स्वीकारला 

काय होणार, फाशी होणार का... तिघांनाही होण्याची गरज आहे... अशी चर्चा सुरू होती. त्याच वेळी एकाचा मोबाईल वाजला. आलेला कॉल नगरमधील नातेवाईकाचा होता. अरे फोन आला, बोलू नका शांत बसा, असे म्हणत संभाषण सुरु झाले. तिघांनाही फाशी झाल्याचा निरोप मिळतो आणि सर्वाचे चहरे आनंदी होतात. अखेर न्याय मिळाला... उपस्थित पत्रकार आणि पोलिस अधिकार्‍यांचे ग्रामस्थ शिवाजी सुद्रिक आभार मानतात.. साहेब सर्वांमुळे न्याय मिळाला, एक जण पळत जाऊन देवाची घंटी वाजवतो. चेहर्‍यावर न्याय मिळाल्याचा आनंद पण त्याचे प्रदर्शन कोणी करीत नाही. अतिशय शांतपणे निकाल स्विकारला जातो...एक आदर्श या गावामध्ये या वेळीही ग्रामस्थांनी दाखवून दिला!

निर्भयाच्या आजीने फोडला हबंरडा 

माझी छकुली गेली... त्यांना फाशी झाली... त्यांना काय मिळाले.. माझ्या कोकराला मारून साहेब... त्यांना फाशीच व्हायला पाहिजे होती साहेब.. पण माझी छकुली परत येईल का.. असे म्हणत मुलीच्या आजीने निकाल ऐकताच हंबरडा फोडला. यावेळी सर्व परिसर एकदम शांत झाला होता. पाच मिनिटे कोणीच कोणाशी काहीही बोलले नाही.

संभाजी बिगे्रडने वाहिली श्रध्दांजली

निकाल लागल्यावर निर्भयाच्या आजीला सोबत घेऊन  संभाजी ब्रिगेडचे राज्याचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे, राजेश परकाळे, टिळक भोस, निलेश तनपुरे, राहुल नवले, दीपक तनपुरे, दत्ता भोसले, दिलीप घरत, पृथ्वीराज चव्हाण, महेश तनुपरे यांच्यासह राज्यभरातून आलेल्या पदाधिकार्‍यांनी निर्भयाला श्रध्दांजली वाहिली. त्यावेळी आजीला भावना आवरत नव्हत्या. शिवानंद भानुसे आणि राजेश परकाळे यांनी न्याय मिळाला आहे मात्र शिक्षेची अंमल बजवाणी तातडीने करावी, अशी मागणी केली. त्यासाठी संभाजी ब्रिगेड राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी दिला.