Wed, Apr 24, 2019 07:32होमपेज › Ahamadnagar › कर्जत डेपोअभावी मुली असुरक्षित

कर्जत डेपोअभावी मुली असुरक्षित

Published On: Dec 14 2017 1:43AM | Last Updated: Dec 13 2017 11:00PM

बुकमार्क करा

कर्जत : प्रतिनिधी

कोपर्डी घटनेनंतर ग्रामीण भागामध्ये मुलींच्या शिक्षणाचा प्रश्‍न अनेक गावांमध्ये एसटी नसल्याचे पुढे आल्याने अधिकच गंभीर झाला आहे. मुलींना शिक्षणासाठी पायी जावे लागते किंवा सायकलचा वापर करावा लागतो. हाच प्रवास त्यांच्या अडचणीचा ठरत आहे. अशा घटना टाळण्यासाठी कर्जतला एसटी डेपो होण्याची गरज आहे. सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी डेपोचा प्रश्‍न मांडून त्याचा पाठपुरावा केल्यास डेपोचा प्रश्‍न मार्गी लागेल आणि मुलींच्या शिक्षणाचा आणि सुरक्षेचा प्रश्‍न सुटेल. कोपर्डी आणि नंतर घडलेल्या घटनांचे बीज डेपोच्या प्रश्‍नातही रोवले आहे. बस नसल्याने जमेल त्या मार्गाने मुलींना शाळेत जावे लागते. हिच संधी टवाळखोरांना आणि समाज कंटकाना मिळते आहे.   

कर्जतला एस टी डेपो होणार..होणार..नक्की होणार असे येथील अनेक पिढ्या केवळ घोषणाच ऐकत आहेत.  प्रत्यक्षात हा प्रश्‍न सुटलेला नाही. कर्जत हे नगर जिल्ह्यातील एमकेव तालुक्याचे ठिकाण असे आहे की जिथे एस टीचे आगार नाही. त्यामुळे तालुक्यातील विकासाला मोठा अडसर झाला आहे.तालुक्यातील आजही अनेक गावे अशी आहेत कीजेथे एसटी जात नाही. यामुळे ही गावे अद्यापही वंचित राहिलेली आहेत. याही पेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील मुली आणि मुलांचा शिक्षणाचा प्रश्‍न फार गंभीर झालेला आहे. मात्र याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाही. आजही ग्रामीण भागामधून अनेक विद्यार्थी सायकल किंवा पायी शाळेमध्ये जाताना दिसतात. यामध्ये अनेक गावामध्ये तर धड चालण्यायोग्य रस्ताही नाही. पावसाळ्यात हा रस्ता जीवावर बेतणारा असतो. पाण्यामधून जीव धोक्यामध्ये घालून मुले आणि मुली शाळेमध्ये जाताना आजही दिसतात. 

सर्व शिक्षा आभियान, साखर शाळा, रात्रीच्या शाळा, प्रोढ साक्षर, अशा प्रकारे प्रत्येक जण सुशिक्षत असावा. त्याला किमान लिहता आणि वाचता यावे, यासाठी करोडे रूपये खर्च करून सरकार जहिरात दाखवते ‘स्कूल चले हम’ मात्र हे शाळेत जाणे आज किती जिकरीचे झाले आहे. अनेक वेळा ते किती सुरक्षीत आहे, हे घडणार्‍या घटना वरून दिसून येते. कोपर्डी येथील निर्भयाची घटना घडली. या नंतर तालुक्यात भांबोरा येथे पण पुन्हा तसा प्रयत्न झाला. मात्र केवळ नशिब बलवत्तर म्हणून ती बचाचली. मात्र त्याच वेळी सर्वांच्या लक्षात आले होते की ग्रामीण भागामध्ये शाळेमध्ये जाण्यासाठी एसटी किंवा अन्य वाहणांची व्यवस्था नाही. त्यामुळे मुली असुरक्षित आहेत. नंतर राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी कोपर्डी येथे दोन स्कूल बस मुलींसाठी सुरू केल्या होत्या. मात्र अशा एक व दोन बसने मुलींच्या शिक्षणाचा आणि सुरक्षेचा प्रश्‍न सुटणारा नाही.  

घोषणा आणि आश्‍वासने कर्जत येथे एसटीचे आगार होणार, अशी घोषणा अनेक वेळा झाली. डेपो साठी मंत्रालयात अनेक बैठका झाल्या. कधी मिनी एस टी डेपो होणार असे जाहीर होते, तर कधी फक्त दहा जादा गाड्या देण्याची घोषणा होते. कधी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे सांगितले जाते तर कधी कुठला तरी बंद डेपो येथे हलविणार असल्याची घोषणा होते. मात्र केवळ आणि केवळ घोषणा आणि आश्‍वासनेच कर्जतकरांच्या नशिबी येत आहेत.