होमपेज › Ahamadnagar › तुकाईचारीने कर्जतमध्ये जलक्रांती

तुकाईचारीने कर्जतमध्ये जलक्रांती

Published On: Mar 26 2018 1:34AM | Last Updated: Mar 25 2018 10:50PM.कर्जत : गणेश जेवरे

कर्जत तालुक्यातील 21 गावांसाठी संजीवनी देणार्‍या तुकाई चारी योजनेसाठी 100 दशलक्ष घनफूट पाणी मंजूर करण्यात आले आहे. राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकाराने हा निर्णय झाला आहे. हा या योजनेतील सर्वात महत्वाचा टप्पा असून अनेक पिढयांचे स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. मुंबई येथे या आठवड्यामध्ये 22 मार्च रोजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय झाला.

काय आहे तुकाईचारी योजना

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांनी कार्यालयीन माहितीसाठी तुकाई चारीचा एक प्रकल्प अहवाल राज्यामध्ये युती शासन असताना प्रसिद्ध केला होता.  कुकडी डावा कालवा  किमी क्रमांक 172 सा.क्र 171/880 पासून उपसा सिचंनाद्वारे कर्जत तालुक्यातील अवर्षणग्रस्त गावांच्या लघुपाटबंधारे तलाव व पाझर तलावात कुकडी प्रकल्पाचे अतिरिक्‍त पाणी सोडणे हा आहे .कुकडी डावा कालवा किमी 172 हा बिटकेवाडी हदीमधून पुढे जातो. कुकडी कालव्याच्या निरीक्षण पथ बाजूस उत्तरेकडे 4 ते 5 किमी अतंरावर तुकाईचा डोंगर आहे.

या डोंगरावर खुंरगेवाडी हे गाव आहे. कुकडी कालवा 171/880 पासून 1200 मिमी व्यासाची लोखंडी पाईपलाईन करून साधारण 4 हजार 500 मीटर अंतरावर खुंरगेवाडीजवळ पाणी सोडावे लागणार आहे. पुढे 4. 890 किमी लांबीचा कालवा प्रस्तावित केला आहे. 65 मी उंचीवर कुकडी कालव्यातून पाणी उपसा सिंचन पद्धतीने उचलावे लागणार आहे. ही योजना दोन टप्प्यामध्ये प्रस्तावित करण्यात आली आहे. 

मा.आ. सदाशिव लोखंडे यांचा प्रयत्न 

तुकाईचारीचा वरील प्रस्ताव घेऊन तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे हे तत्कालीन पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांना शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ घेऊन भेटले होते.आ.लोखंडे यांनी 12 ऑक्टोबर 1998 रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. तसेच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख दिवंगत माणिकराव पाटील यांनी शासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. 

कुकडी प्रकल्पातील पाणी मिळणार

राज्यामध्ये 15 वर्षे काँग्रेस आघाडीचे सरकार होते. यामुळे तुकाईचारीच्या बाबत कोणताच निर्णय झाला नाही. मात्र, या योजनेसाठी पालकमंत्री प्रा.शिंदे यांनी सुरुवातीला आमदार असताना पाठपुरावा केला, मात्र सरकार विरोधी असल्याने यश आले नाही मात्र ते पुन्हा आमदार झाले. केवळ आमदार नाही तर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री झाले. यामुळे ही योजना होईल अशी आशा निर्माण झाली. या योजनेसाठी पाणी कुकडी प्रकल्पात शिल्लक नाही असे जलसंपदा विभागाचे सचिव प्रत्येक वेळी सांगून ही योजना होणार नाही असे सांगत. एवढेच नाही तर कृष्णा खोरे विकास मंडळाने प्रकल्प अहवाल तयार केलाच नाही, असे ठासून सांगत असत. यामुळे या योजनेचे भवितव्य धूसर होते.

मात्र, सन 1990 साली अस्तित्वात आलेली गोदावरी योजनेसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सुप्रमा कॅबिनेटमध्ये मांंडली. त्याला पालकमंत्री  शिंदे यांनी कडाडून विरोध केला व कुकडी प्रकल्प 1965 चा असूनही त्यास सुप्रमा मिळत नाही हा अन्याय आहे यामुळे गोदावरी योजनेसाठी आमचा विरोध आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुकडी प्रकल्पास सुप्रमा देण्याची सूचनाअधिकारी यांना केल्या. तसा प्रस्ताव दाखल करा असे सांगितले. 

सत्‍तेचा फायदा व हक्‍काचे पाणी 

यानंतर पालकमंत्री शिंदे यांनी जलसिंचन विभागाचे अधिकारी यांच्या अनेक बैठका घेतल्या. कुकडी प्रकल्पाचे 33. 593 दशलक्ष घनफूट एवढे पाणी वाटप कसे केले आहे, कोठे अतिरीक्‍त पाणी आहे याचा अभ्यास अधिकार्‍यांना करण्यास सांगितले असता या प्रकल्पातील पुष्पावती व इतर काही बंधारे दिसून आले.  तिथे आतिरक्‍त पाणी देण्यात येत आहे. ते सर्व पाणी कमी केल्यावर 0.400 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक निघाले असता राम शिंदे यांनी हे सर्व पाणी कर्जत व जामखेड तालुक्यासाठी घेतले. यामध्ये तुकाईचारीसाठी 0.100 पाणी मिळणार आहे. याशिवाय चौंडी, दिघी व जवळा हे जामखेड तालुक्यातील तर पाटेवाडी कर्जत यांचेसाठी 0.75, सीना प्रकल्प कर्जत 0.225, बिटकेवाडी 0.007 असे नियमित आवर्तनाचे पाणी देण्याचा निर्णय झाला. त्याचा समावेश कुकडी प्रकल्पामध्ये अधिकृत करण्यात आला. यामुळे तुकाईचारीचा मोडा अडसर पाण्याचा दूर झाला आहे.

जलसंधारण खात्याकडून निधी  

पाटबंधारे विभागाने नवीन सुप्रमा तयार केला आहे. यामध्ये तुकाईचारीस मान्यतेसह कुकडी प्रकल्पासाठी 1900 वाढीव निधी घेतला आहे. कॅबिनेटपुढे हा प्रस्ताव मांडल्यावर त्याला तात्काळ मान्यता देण्याचे सर्व शेतकर्‍यांच्या समक्ष पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांनी पालकमंत्री शिंदे यांना आश्‍वासन दिले आहे. याशिवाय या योजनेसाठी पाटबंधारे विभागाने फक्‍त कुकडीमधून पाणी देण्यास उपलब्ध आहे एवढेच प्रमाणपत्र द्यावयाचे असून, या तुकाईचारी उपसा सिंचन व पाईपलाईन यासाठी लागणारा निधी हा पालकमंत्री शिंदे यांच्या जलसंधारण खाते करणार आहे. यामुळे या योजनेसाठी निधीची अडचण येणार नाही. स्वतःच मंत्री आणि मतदारसंघातील काम असल्याने हमखास ही योजना पूर्ण होईल. पावसाचे ओव्हरफ्लोचे पाणी ज्या योजनेसाठी मागितले जात होते त्या योजनेला हक्‍काचे व कायमचे पाणी मिळणार हा फार मोठा निर्णय आहे. याचे श्रेय पालकमंत्री राम शिंदे यांना द्यावेच लागेल.