Thu, Apr 25, 2019 15:42होमपेज › Ahamadnagar › महावितरणमध्ये वाजवले ढोल

महावितरणमध्ये वाजवले ढोल

Published On: Dec 05 2017 1:49AM | Last Updated: Dec 05 2017 12:19AM

बुकमार्क करा

कर्जत : प्रतिनिधी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या युवक अघाडीच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयामध्ये विविध मागण्यांसाठी ढोल बजाओ आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये भास्कर भैलुमे, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, भाऊ तोरडमल, अजय भैलुमे, विशाल काकडे, शहराध्यक्ष सागर कांबळे, अनुराग भैलुमे, धिरज पवार, जमीर शेख, सचिन धेंडे, राजु भैलुमे, पप्पू लोंढे, मिलींद भैलुमे, सुशांत भैलुमे, सनी वेळेकर, किरण भैलुमे, श्रीधर लोंढे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळी अकरा वाजता आरपीआयचे कार्यकर्ते महावितरण कार्यालयात गेले. यावेळी अधिकारी नव्हते. त्यानंतर त्यांनी कार्यालयामध्ये अधिकार्‍यांच्या खुर्चीला हार घालत ठिय्या दिला. काही वेळानंतर ढोल बजाओ आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी कर्जत उपविभागामध्ये इन्फ्रा 2 मध्ये मंजुर झालेल्या 3 फेज डीपींची कामे सुरू करण्याची मागणी केली. ज्या ठिकाणी 63 केव्हीचे ट्रान्स्फार्मर आहेत, तेथे व ज्या डीपी व जादा लोड आहे, अशा सर्व ठिकाणी 100 केव्हीचे ट्रान्स्फॉर्मर बसवावेत, डीपीडीसीच्या टेंडरची कामे करावीत,  इन्फ्रा 2 मध्ये मंजूर सिंगल फेजची कामे करावीत, इन्फ्रा 2 मध्ये अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यात यावी, बापुराव कदम यांच्या प्लॉटमध्ये नियमबाह्य वीजवाहिनी टाकली आहे, ती काढण्यात यावी. सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत कोणत्या कामांना वर्क ऑर्डर देण्यात आल्या, त्याची माहिती द्यावी, कर्जत उपविभागमध्ये सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकी कशा केल्या आहेत, याची सविस्तर माहिती मिळावी आणि न्यू एस आय मध्ये मंजुर झालेली कामे किती दिवसांमध्ये पूर्ण होतील, याचा खुलास करण्यात यावा आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. तसे निवेदन या पूर्वीच देण्यात आले होते.

या वेळी आंदोलकांशी महावितरणचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी शैलेश जैन यांनी प्रत्येक मागणी बाबत सविस्तर चर्चा केली. जी कामे वरिष्ठ कार्यालयाशी निगडीत आहेत, या बाबत वरिष्ठ कार्यालयाकडे तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच या मागण्यांसंदर्भात जी माहिती उपलब्ध आहे, ती देताना मागण्यांना लेखी उत्तर दिले. लेखी आश्‍वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र मागण्यांप्रमाणे कामे सुरू झाली नाही, तर पुन्हा आंदोलनाचा इशारा भास्कर भैलुमे यांनी दिला.पोलिस कर्मचारी मनोज लातुरकर हे उपस्थित होते.