Tue, Jul 16, 2019 23:55होमपेज › Ahamadnagar › कोपर्डीतील शालेय विद्यार्थिनींसाठी एसटी सुरू

कोपर्डीतील शालेय विद्यार्थिनींसाठी एसटी सुरू

Published On: Dec 12 2017 2:03AM | Last Updated: Dec 11 2017 10:59PM

बुकमार्क करा

कर्जत ः प्रतिनिधी 

कोपर्डी येथील घटनेनंतर शाळेमध्ये मुली आणि मुलांसाठी श्रीगोंदे आगाराने महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि पोलिस उपायुक्त यांचे सूचनेनंतर एसटी सुरू केली होती. यानंतर न्यायालयाने नुकतीच तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. यानंतर श्रीगोंदे आगाराने कोपर्डी गावामध्ये येणारी एसटी कोणतीही सूचना न देता बंद केली. यामुळे कोपर्डी येथून कुळधरण आणि कर्जत येथे शिक्षणासाठी जाणार्‍या मुलींचे हाल होत होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच श्रीगोंदे आगाराचे आगार व्यवस्थापक सुतार यांनी दखल घेतल्यानंतर सोमवारपासून कोपर्डीसाठी एसटी सुरू झाली.

कोपर्डी येथे फक्त 1 ली ते 4 थी शाळा आहे. यापुढील शिक्षणासाठी मुलींना  कुळधरण, शिंदा किंवा कर्जत येथे जावे लागते. कोपर्डी हे गाव एकतर मुख्य रस्त्यापासून 5 किमी अंतर आतमध्ये आहे. हा रस्ता फारसा वाहतुकीचा नाही. याशिवाय मध्ये जंगलाचा भाग आहे आणि शेती आहे. यामुळे या रस्त्याने पायी किंवा सायकलवर जाताना मुलींना धोका आहे. कोपर्डी येथील निर्भयाची घटना अद्याप कोणीच विसरलेले नाही. या घटनेनंतर मुलींसाठी एसटी सुरू झाली. मात्र, काहीही कराण नसताना बंद केल्याने  विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा प्रश्‍न टांगणीला लागला होता. याबाबचे वृत्त प्रसिद्ध होताच श्रीगोंदे आगाराने पुन्हा एसटी सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

कोपर्डी गावात एसटी पुन्हा सुरू होणार म्हणून शाळेमध्ये जाणार्‍या मुली व ग्रामस्थ सकाळपासूनच वाट पाहत होते. एसटी गावामध्ये येताच चालक, वाहक आणि एसटीचे गुलाल लावून स्वागत करण्यात आले. यानंतर श्रीफळ वाढविण्यात आला. यानंतर गावातील मुलींना प्रथम एसटीमध्ये बसविण्यात आले. रोज सकाळी नऊ वाजता गावामध्ये एसटी येणार आहे. ती मुलींना शाळेमध्ये सोडून परत कर्जत येथे येणार आहे. पुन्हा शाळा सुटल्यावर सायंकाळी सव्वाचार वाजता बस  येणार आहे.