Sat, Jul 20, 2019 23:20होमपेज › Ahamadnagar › कर्जतचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला : रणजित पाटील 

कर्जतचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला : रणजित पाटील 

Published On: May 21 2018 1:08AM | Last Updated: May 20 2018 11:24PMमिरजगाव : वार्ताहर

कर्जत तालुका हा मागील अनेक वर्षांपासून दुष्काळी तालुका म्हणून जिल्ह्यात ओळखले जात होता. आज राज्याचे जलसंधारण मंत्री व या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी प्रा. राम शिंदे व नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या प्रयत्नामुळे कर्जत शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटला आहे.  या भागातील जनतेला हक्काचे पाणी मिळाले आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केले. 

कर्जत शहर पाणीपुरवठा योजना लोकार्पण व वचनपूर्ती सोहळ्यात ना. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राम शिंदे होते. यावेळी नगराध्यक्ष नामदेव राऊत उपस्थित होते. ना. पाटील म्हणाले, कर्जत शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन ना. शिंदे काम करीत आहेत. तालुक्यात तसेच कर्जत शहराभोवती मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली. तसेच पावसाळ्यात वाहणार्‍या लेंडी नदी ते कान्होळा नदीच्या पात्रात जलयुक्त शिवार योजनाअंतर्गत मोठ्या प्रमाणात खोलीकरण व रूंदीकरणाचे कामे करून कर्जत गावाच्या सभोवताली पाणी पाणी केले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गात उत्साह निर्माण झाला. कर्जत गावाचा जिरायतदार असणारा शेतकरी बागायतदार बनला आहे. 

ना. शिंदे म्हणाले, कर्जतकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या योजनेचे मी लोकार्पण करत आहे. प्रास्ताविक करताना नगराध्यक्ष राऊत यांनी कर्जतकरांच्या पाण्याचा संघर्ष व खासकरून महिला वर्गाची होणारी परवड उपस्थित मंत्र्यांसमोर मांडली. मात्र आजपासून हे सर्व चित्र बदलले जाणार असून, आपल्या कार्यकाळात कर्जतकरांना शुद्ध पाणी उपलब्ध करत असल्याचे समाधान व्यक्त केले. गावाच्या आणि शहराच्या विकासासाठी आपण राजकारण न करता सर्व नगरसेवकांना एकत्र घेत चांगले काम उभारण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत नगरपंचायतीसाठी ना. शिंदे यांच्याद्वारे 75 कोटींचा निधी प्राप्त केला आहे. त्या अनुषंगाने विविध प्रभागांत विकासकामे सुरू आहेत. लवकरच कर्जत बारामती सारखी करायची, असा आपला ध्यास आहे. यावेळी खा. दिलीप गांधी, अशोक खेडकर, स्वप्नील देसाई, सुरेश खिस्ती, प्रसाद ढोकरिकर यांची भाषणे झाली. 

यावेळी मुख्याधिकारी साजिद पिंजारी, सभापती पुष्पा शेळके, रामदास हजारे, अल्लाउद्दीन काझी, आरपीआयचे संजय भैलुमे, विजय तोरडमल, सुभाष तनपुरे, रवी सुरवसे, महेश निमोणकर, दीपक शहाणे, उमेश जेवरे, विनोद दळवी, कार्यालयीन प्रमुख संतोष समुद्र, नगरसेवक सुधाकर समुद्र, संदीप बारबडे, सचिन घुले, सोमनाथ कुलथे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले शुद्ध पाण्याचे कलश घेऊन निघालेल्या महिलांची मिरवणूक. पारंपरिक वाद्यांच्या गजरात शहरातील मुख्य बाजार पेठेतून मिरवणूक काढण्यात आली. स्वागत उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके यांनी केले. सूत्रसंचालन नीलेश दिवटे यांनी केले, तर मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी आभार मानले.