Sun, May 26, 2019 11:38होमपेज › Ahamadnagar › कर्जत शहरात पाळला कडकडीत बंद

कर्जत शहरात पाळला कडकडीत बंद

Published On: Feb 18 2018 1:54AM | Last Updated: Feb 17 2018 11:41PMकर्जत : प्रतिनिधी 

नगर महानगरपालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा कर्जत येथे विविध संघटनांनी निषेध केला. तसेच कडकडीत बंद पाळून, रास्ता रोको आंदोलन केले.  

छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. या घटनेचा काल कर्जत तालुक्यातील मिरजगाव, माहीजळगाव, कुळधरण,  आंबीजळगाव, आळसुंदे, कापरेवाडी या ठिकाणी बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. कर्जत येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातून निषेध फेरी काढण्यात आली. कर्जत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

यावेळी संभाजी ब्रिगेडचे राहुल नवले व युवा नेते मिठू धांडे यांची भाषणे झाली. छिंदम याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बहिरोबावाडीचे सरपंच विजय तोरडमल, गजेंद्र यादव, पप्पू तोरडमल, श्रीराम गायकवाड, अभय बोरा, डॉ. नितीन तोरडमल, पिंटू धांडे यांच्यासह सकल मराठा समाजाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

कर्जत तालुका रिपब्लिकन पक्षाच्यावतीने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर भैलुमे, अनुराग भैलुमे, सचिन धेंडे, संतोष जाधव, सचिन गोरे, प्रशांत वटाने, जावेद सय्यद आदी उपस्थित होते. 

कर्जत शहर शिवसेनेच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. याबद्दल तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी गणेश क्षीरसागर, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष तोरडमल, बिभीषण खोसे, राजू येवले, अनुज कुलथे, राम पोटरे, संतोष भोज आदी उपस्थित होते. कर्जत तालुका वकील संघटनेच्या वतीने काल काम बंद आंदोलन केले.