होमपेज › Ahamadnagar › बापूसाहेब देशमुख अनंतात विलीन

बापूसाहेब देशमुख अनंतात विलीन

Published On: Jan 20 2018 1:38AM | Last Updated: Jan 19 2018 11:08PMकर्जत/राशीन : प्रतिनिधी 

ज्येष्ठनेते, सहकारमहर्षी बापूसाहेब देशमुख यांचे काल (दि. 18) सकाळी साडेनऊ वाजता निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी सहा वा. राशिन सोनाळवाडी रस्त्यालगत त्यांचे शेतामधील जागेमध्ये हजारोंच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.  या लाडक्या नेत्याला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. आठवणींची भरती अनेकांच्या हृदयात जमा झाली होती. अजातशत्रू असे या तालुक्याचे हिमालयाच्या पहाडासारखे विशाल व्यक्‍तीमत्व असेलला हा आधारवड आज कोसळला होता. प्रत्येक जण जड अंत:करणाने पहात होता. कोणीच कोणाशी बोलत नव्हते. मात्र मूक संवाद चालू होता. विचारांचे काहूर प्रत्येक मनात होते. अतिशय भावपूर्ण वातावरणात अंत्यविधी झाला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष व नामांकित पहिलवान के. रा. उर्फ बापूसाहेब देशमुख यांचे काल (दि. 18) सकाळी साडेनऊ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. राशिन येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्यानिधनाच्या वृत्ताने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी चिमनबाई, मुले विजयराव, विठ्ठलराव व श्रीकांत, मुलगी अज्वला, नातू विक्रम, राजेंद्र, बंधू निलकंठराव व विश्‍वासराव, सुना, नातवडे असा मोठा परिवार आहे.

बापूसाहेब देशमुख यांचे सहकार क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये मोठे योगदान आहे. वडील कै. रावसाहेब देशमुख यांनी राशीनसह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शेतकरी, शेतमजुर, गोरगरीब कुटुंबांसाठी मदतीचा हात देण्याचा वारसा बापुसाहेबांनी शेवटपर्यंत जपला. सहकार व शेतकर्‍यांचे प्रश्‍न आणि कुस्ती क्षेत्र या विषयी बापुसाहेबांचा दांडगा अभ्यास होता. काँग्रेसचे निष्ठावान नेते अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या राजकीय उमेदीच्या काळात कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघ कायम राखीव राहिला. त्यामुळे त्यांचे आमदारकीचे स्पप्न पूर्ण झाले नाही.

बापूसाहेब देशमुख यांची कारकिर्द 

कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिकच्या माळरानावर त्यांनी जगदंबा सहकारी साखर कारखाना उभा केला. जिल्हा परिषदेपासून राजकीय जीवनाला सुरवात केली. त्यांची कारकिर्द पाच दशकांची आहे. सहकार, शिक्षण, उद्योग, बँक, शेतीक्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे. जिल्हा बँकेच्या वाटचालीत बापुसाहेबांचे मोठे योगदान आहे. 30 वर्षे ते जिल्हा बँकेचे संचालक आहेत.  बँकेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. कर्जत पंचायत समितीचे ते सलग 17 वर्षे सभापती होते. जगंदबा कारखान्याचे 18 वर्षे चेअरमन होते. तालुका दूध संघ स्थापनेत त्यांचे कार्य मोलाचे आहे. यामध्ये बाजार समिती, खरेदी विक्री संघ, सेवा संस्था, देखरेख संघ या संस्थांची स्थापना करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

अंत्ययात्रेस प्रचंड गर्दी

बापूसाहेबांच्या निधनाचे वृत्त वार्‍यापेक्षाजी जास्त वेगाने जिल्ह्यात परसले. सुरवातीला कोणाचाच विश्‍वास बसत नव्हता. वय 86 वर्षे असले तरीही त्यांचा उत्साह तरूणांना लाजवेल असा होता. पहिलवान असल्याने व्यक्‍तीमत्वाचा रूबाब कायम होता. माहिती मिळताच प्रत्येकजण राशिनला देशमुख वाड्यावर या ऋषीतूल्य नेतृत्वाचे दर्शन घेण्यासाठी जात होता. राशिनमध्ये माहिती समजताच काही मिनिटांतच बाजारपेठ व सर्व व्यवहार नागरिकांनी स्वत: बंद केले. 
अंत्ययात्रा सांयकाळी साडेपाच वाजता वाड्यावरून निघाली तेव्हा हजारो जण यामध्ये सहभागी झाले होते. जगदंबादेवीच्या निस्सीम भक्‍ताला अखेरचा निरोप देण्यात येत होता. देशमुख वाडयापासून अंतिम ठिकाणापर्यत रस्त्यावर सर्वत्र सडा टाकण्यात आला होता. दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा अबाल वृध्द उभे होते. फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. बापूसाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव विजयदादा देशमुख यांनी अग्नी दिला. यावेळी त्यांचे नातू विक्रम, राजेंद्र, विशाल, शंकर देशमुख होते.  यावेळी उपस्थित सर्वाच्या भावनांचा बांध फुटला. बापुसाहेबांचे सर्व स्तरातील मित्र उपस्थित होते. त्यांना आपल्या भावना लपवता येत नव्हत्या. अनेकांनी अश्रूंना वाट करून दिली.

अंत्यविधीसाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खा. दिलीप गांधी,  जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजीमंत्री बबनराव पाचपुते, घन:श्याम शेलार, नगराध्यक्ष नामदेव राऊत,राजेंद्र फाळके, संभाजीराजे भोसले, जिल्हा बँकेच्या संचालिका मिनाक्षीताई साळुंके, जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल घोडके, जिल्हा बँकेच्या संचालिका मिनाक्षीताई साळुंके, अशोक खेडकर, किरण पाटील, जगन्‍नाथ राळेभात, कैलास शेवाळे, सोलेपाटील, श्रीधर पवार, बापुसाहेब नेटके, प्रकाश शिंदे, संतोष खळगे, प्रसाद ढोकरीकर, ज्ञानदेव लष्कर, नानासाहेब निकत, सुनिल शेलार, काका धांडे, बप्पासाहेब धांडे, शाहुराजे भोसले, मालोजी भिताडे, सतिश पाटील,तात्या ढेरे, अल्लाउद्दिन काझी, शहाजीराजे भोसले, विजय मोडळे, रवी पाटील, अ‍ॅड. विश्‍वनाथ आरडे, अ‍ॅड. माणिकराव मोरे, अ‍ॅड. शिवाजीराव अनभुले, दादा सोनमाळी, सोमनाथ कुलथे, सरपंच श्याम कानगुडे आदींसह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित नेत्यानी श्रध्दांजली वाहिली   

पालकमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, बापुसाहेब देशमुख हे नगर जिल्ह्यातील राजकारणातील अजातशत्रू नेते होते. कर्जत तालुक्याच्या जडण घडणीमध्ये त्यांचा वाटा मोठा आहे. राजबिंडे व्यक्‍तीमत्व असलेला नेता हरपला आहे.
शालिनीताई विखे म्हणाल्या, बापुसाहेब देशमुख हे नगर जिल्ह्यातील राजकारणातील दीपस्तंभ होते. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. खा. दिलीप गांधी म्हणाले, बापुसाहेब हे दूरद‍ृष्टी असेलेले नेते होते. रूबाब हा त्यांच्या राजकीय पदाला नेहमी शोभून दिसत होता. बबनराव पाचपुते म्हणाले, जिल्ह्यातील सहकारातील व शेतीमधील अभ्यासू नेतृत्व आज आपल्यामधून निघून गेले आहे. घन:श्याम शेलार म्हणाले, जिल्ह्याचा अधारवड आज उन्माळून पडला आहे. कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. राजेंद्र फाळके म्हणाले, एक संयमी नेतृत्वाचा अखेर आज झाला आहे.

नामदेव राऊत म्हणाले, जिल्ह्यातील सर्व युवकांचा आदर्श असे नेतृत्व आज निघून गेले आहे. संभाजीराजे भोसले म्हणाले, बापुसाहेब देशमुख यांच्या निधनाने कर्जत तालुका शोकाकूल झाला आहे. विश्‍वनाथ आरडे म्हणाले, 50 वर्षे राजकाणात इतके उत्तूंग व्यक्‍तीमत्व आणि तेही अतिशय साधेपण जपणारे आता पुन्हा दिसणार नाही. मोहनराव देशमुख म्हणाले, धृव्व तारा निखळला. शहाजीराव काकडे म्हणाले, ऋषीतूल्य नेतृत्वास तालुका, जिल्हा मुकला.