Wed, May 22, 2019 07:04होमपेज › Ahamadnagar › कर्जतला जागरण गोंधळ आंदोलन

कर्जतला जागरण गोंधळ आंदोलन

Published On: Jan 23 2018 1:18AM | Last Updated: Jan 22 2018 11:23PMकर्जत  : प्रतिनिधी

कर्जतला एसटी आगार होण्यासाठी काल वृद्ध भूमिहीन शेतमजूर, महिला व ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे बसस्थानकावर सुमारे 5 तास जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. पालकमंत्री राम शिंदे यांना घेराव घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष शब्बीर पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सय्यद काटेमापवाले, किसन शिंदे, सविता सुद्रिक, आशाबाई क्षीरसागर, नगरसेविका मनीषा सोनमाळी, निर्मला खराडे, हरिश्‍चंद्र काळे, छाया पडवळकर, शाहजान सय्यद, शोभा पवार, जयसिंग निंबोरे, निवृत्ती गिरी, बबई आहिरे, मुमताज शेख यांच्यासह शेकडोे महिला व पुरुष आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पठाण म्हणाले, कर्जत येथे एसटी आगार नाही. त्यामुळे तालुक्यातील गोरगरिबांचे अतोनात हाल होत आहेत.

ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तालुक्यातील अनेक गावे अशी आहेत की, जेथे अद्यापही एसटी बस जात नाही. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत एसटी डेपो आहेत. कर्जतला अद्यापही डेपो देण्यात आलेला नाही. तो तातडीने देण्यात यावा. येथे डेपो नसल्याने ग्रामीण भगातील मुलींच्या शिक्षणाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यामुळे तातडीने एसटी डेपोस मंजूर करावा. दोन महिन्यांत डेपोचा प्रश्‍न मार्गी लागावा, अन्यथा 10 हजार नागरिकांना घेऊन पालकमंत्री राम शिंदे यांना घेराव घालू, असा इशारा पठाण यांनी दिला. तसेच  अरेरावी करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, तालुक्यातील प्रत्येक गावात एसटी बस सुरू करावी, कर्जत बसस्थानकावर दोन जादा गाड्यांची तरतूद करावी, बसस्थानकाची इमारत स्वच्छ ठेवावी, पिण्याच्या पाण्याची सोय करावी, विद्युत दिवे बसवावेत, अशा मागण्याही यावेळी त्यांनी केल्या. यावेळी एसटीचे अधिकारी सुतार व नायब तहसीलदार धनराज नमयाने यांनी आंदोलकांची भेट दिली. त्यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.