Tue, Apr 23, 2019 23:46होमपेज › Ahamadnagar › मोबाईल चोरताना रंगेहाथ पकडले

मोबाईल चोरताना रंगेहाथ पकडले

Published On: Dec 13 2017 1:52AM | Last Updated: Dec 12 2017 10:46PM

बुकमार्क करा

करंजी : वार्ताहर

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील मंगळवारच्या आठवडे बाजारच्या दिवशी भाज्या खरेदी करण्यासाठी येणार्‍या बाजारकरूंचे मोबाईल चोरणार्‍या दोघाजणांना करंजी येथील तरुणांनी रंगेहात पकडले. पकडलेल्या चोरांमध्ये एकजण अल्पवयीन आहे. 

करंजी येथील मंगळवारचा आठवडे बाजार दुपारी दोन वाजता गर्दीने ‘हाऊसफुल्ल’ झाला होता.  संभाजी ब्रिगेडचे दतात्रय अकोलकर भाजी घेत असताना त्यांच्या शर्टच्या वरच्याखिशात ठेवलेला मोबाईल अलगत काढून तेथून पळ काढणार्‍या अल्पवयीन मुलास अकोलकर यांनी पाठलाग करून पकडले. त्याच्या हातातील मोबाईल काढून घेतला. त्यास करंजी पोलिस चौकीत नेले. परंतु पोलिस चौकीला नेहमीप्रमाणे कुलूप होते. अकोलकर यांनी पाथर्डी पोलिस ठाण्याशी संपर्क साधत करंजी पोलिस चौकीचे पोलिस कुठे आहेत? आम्ही मोबाईल चोरणारे पकडले, असे कळविल्यानंतरही गाडी नगरला गेलेली आहे, कोणाला तरी पाठवतो, असे मोघम उत्तर मिळाल्याचे अकोलकर यांनी सांगितले. एक-दीड तासानंतरही कोणीच पोलिस कर्मचारी येईना म्हणून अकोलकर यांनी पकडून ठेवलेल्या अल्पवयीन चोरट्यास सोडून दिले. परंतु तो कुठे आणि कोणाकडे जातो यावर अकोलकर यांनी लक्ष ठेवले. तो बसस्थानकापासून काही अंतरावरील त्याच्या इतर सहकार्‍यांकडे गेला. त्याच्या सहकार्‍यालाही ग्रामस्थांनी पकडले.

करंजीसह तिसगाव, चिचोंडी, मिरी येथील आठवडे बाजारामधून अनेक महिला-पुरूषांचे मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असून पोलिसांना ना आरोपी सापडले ना मुद्देमाल. पोलिस तर तपासाच्या भानगडीतच पडत नाहीत. आठवडे बाजारच्या दिवशी देखील चौकीत  थांबत नसल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे. करंजीत किमान दोन पोलिस कायमस्वरूपी न ठेवल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा मानवाधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश वाघ यांनी दिला आहे. सायंकाळी सहा वाजता पोलिसांनी करंजी येथे येऊन त्या दोघाजणांना ताब्यात घेतले.

मोबाईल चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर

आठवडे बाजारातून मोबाईल चोरी करताना कोणालाही संशय येऊ नये, म्हणून अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याचे करंजीत पकडलेल्या अल्पवयीन मुलाच्या कृत्यावरून स्पष्ट होत आहे.