Thu, May 23, 2019 14:36
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › कानिफनाथ दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

कानिफनाथ दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 09 2018 10:17PMमढी : वार्ताहर

टाळ, मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथांच्या दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. प्रांताधिकारी विक्रमसिंग बांदल व पोलिस उपअधीक्षक पोर्णिमा बांदल यांच्या हस्ते नाथांच्या पादुकांची महापूजा होऊन दिंडी सोहळ्यास प्रांरभ झाला. पूजन, ग्रामप्रदक्षिणा व नाथांचा जयजयकार करीत शेकडो वारकरी, नाथभक्त पंढरपुरकडे रवाना झाले.

नाथ सांप्रदयाच्या सर्वच दिंड्यांना वारकरी सांप्रदायात मानाचे स्थान आहे. ग्रामप्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढून महिलांनी दिंडीचे स्वागत केले.दिंडी प्रस्तानप्रसंगी देवस्थान समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, सचिव सुधीर मरकड, सहसचिव ज्योती मरकड, विश्वस्त शिवाजी मरकड, मधुकर साळवे, अप्पासाहेब मरकड, माजी सरपंच बाबासाहेब मरकड, अशोक महाराज मरकड, रवींद्र आरोळे, माजी अध्यक्ष सचिन मरकड, डॉ. रमाकांत मडकर, विष्णू मरकड, ग्रा. पं. सदस्य अश्‍विनी निमसे, मंदाताई पाखरे आदींसह अबालवृद्ध, महिला, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सरपंच रखमाबाई मरकड यांच्या वतीने अल्पोहार देण्यात आला.  दिंडी ‘चालली चालली...चालली... पंढरपुरा, विठू तुझ्या झेंड्याचा भगवाच रंग, विठुचा गजर हरिनामाचा’ ‘ये गं ये गं विठामाई’, ‘विठू माझा लेकुरवाळा’ यासारखे अभंग, गवळणीचे गायन करत मढी येथील भजनी मंडळींनी भाविकांना मंत्रमुग्ध केले. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की जय, या हरिभक्तांच्या जयघोषाने मढी परिसर दुमदुमन गेला होता. 

ही दिंडी भिंगार येथे दोन दिवसानंतर पोहोचते. तेथे दर्शनासाठी मोठी गर्दी होते.दवना, अत्तर, गुग्गुळ, धूप, भस्मलेपन अशा वातावरणात भाविक कानिफनाथांच्या दिंडीत नतमस्तक होतात. नाथ सांप्रदायाच्या प्रथेप्रमाणे चालणारी पूजा व विधी पाहण्यासाठी वारकर्‍यांची गर्दी होते. विसाव्याच्या ठिकाणी कीर्तन, प्रवचने, भजन, भारूडांचे कार्यक्रम होतात. दिंडीसाठी पंढरपूरच्या वाटेवर अनेक दानशूर व्यक्ती अन्नदान करणार आहेत.