Thu, Mar 21, 2019 16:08होमपेज › Ahamadnagar › ‘कल्पतरु’च्या कामगाराचा अधिकार्‍यांनी केला खून!

‘कल्पतरु’च्या कामगाराचा अधिकार्‍यांनी केला खून!

Published On: Jun 04 2018 1:02AM | Last Updated: Jun 03 2018 11:25PMनगर : प्रतिनिधी

कल्पतरू गु्रप सावेडी कंपनीच्या कामगारास घरातून उचलून नेऊन त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नगर ते निंबळक दरम्यान रेल्वे रुळावर टाकून देण्यात आला. शनिवारी (दि. 2) सकाळी साडेसात वाजण्यापूर्वी ही घटना घडली. 

याप्रकरणी नितीन कांबळे (रा. केडगाव देवी मंदिराजवळ), कल्पतरु गु्रप सावेडी कंपनीचे मॅनेजर व स्टाफविरुद्ध (नावे माहीत नाही) नगर रेल्वे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. साईनाथ आसाराम ठोंबे (रा. खांडके, कौडगाव, ता. जि. नगर) हे मयताचे नाव आहे. कल्पतरु ग्रुप हा नगरमधील एका नामांकित उद्योजकाच्या मालकीचा असल्याने हा गुन्हा दाखल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत रेल्वे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मयत साईनाथ ठोंबे हे कल्पतरु ग्रुप सावेडी कंपनीत काही वर्षांपासून नोकरी करतात. पगार वाढविण्यात यावा, अशी मागणी ठोंबे हे कंपनीच्या व्यवस्थापनाकडे काही दिवसांपासून करीत होते. परंतु, त्यांचा पगार वाढविण्यात आला नाही. त्यामुळे ठोंबे यांनी काही दिवसांपासून कामावर जाणे बंद केले होते. त्यामुळे रात्रीच्या सुमारास कांबळे व कल्पतरु ग्रुप कंपनीचे मॅनेजर, स्टाफमधील काही जण ठोंबे यांच्या घरी गेले. पगार का वाढवून मागतो, या कारणातून त्यांनी साईनाथ यांना बळजबरीने गाडीत बसवून बाहेर नेले. कशाने तरी खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी साईनाथ यांचा मृतदेह रेल्वे मार्गावरील नगर ते निंबळक दरम्यान टाकून देण्यात आला. 

सकाळी साडेसात वाजता रेल्वे रुळावर मृतदेह सापडल्याची माहिती नगर रेल्वे पोलिसांना समजली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा मृतदेह साईनाथ ठोंबे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या खुनामागे नितीन कांबळे व कल्पतरु ग्रुप कंपनीचे अधिकारी, कर्मचारी यांचा हात असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांकडून करण्यात आला. त्यानंतर मयत मुलाचे वडील आसाराम धोंडिराम ठोंबे यांच्या फिर्यादीवरून कांबळे व कंपनीच्या अधिकार्‍यांविरुद्ध रेल्वे पोलिस ठाण्यात खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. डी. शेख हे करीत आहेत. रेल्वेचे पोलिस उपअधीक्षक घोरपडे यांनीही रविवारी (दि. 3) नगरला येऊन घटनेचा आढावा घेतला.