Sun, Oct 20, 2019 02:05होमपेज › Ahamadnagar › काजव्यांच्या नृत्याने मान्सूनची चाहूल

काजव्यांच्या नृत्याने मान्सूनची चाहूल

Published On: May 25 2018 1:07AM | Last Updated: May 25 2018 12:11AMभंडारदरा : वार्ताहर

भंडारदर्‍याच्या धरतीला वर्षाराणीची चाहूल लागली असून  काजव्यांच्या चंदेरी दुनियेची चकमक हिरडा, बेहडा, सादडा या झाडांवर नृत्य करण्यास धजावत असल्याचे दिसू लागले आहे. या प्रकाशमयी तारकांच्या आगमनाचे संकेत म्हणजेच मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याची प्रतिक्रिया आदिवासी बांधवांकडून उपलब्ध होत आहे.   

भंडारदरा परिसरात काजव्यांच्या मायावी दुनियेचे भंडारदर्‍याच्या अभयारण्यात आगमन झाले असून कळसूबाई हरिश्‍चंद्र अभयारण्याच्या अनेक वृक्षराजीवर हे मनमोहक काजवे अधिराज्य गाजवण्यासाठी सरसावले आहेत. संपूर्ण जंगलाला जणू विद्युतरोषणाईने आगच लागल्याचे दृश्य नजरेस अनुभवयास मिळत आहे. या काजवा महोत्सवाचे यावर्षीचे आयोजन भंडारदरा येथील  कळसूबाई हरिश्‍चंद्र गड अभयारण्य, वन्यजीव भंडारदरा यांनी केले आहे. अनेक नियम हे काजवा प्रेमींसाठी बनविले आहेत. 

भंडारदरा म्हटलं की,  पर्यटकांना आठवण येते जलोस्तवाची! परंतु याच भंडारदर्‍याच्या निसर्गात अजूनही खूप काही दडलेले आहे. याची पारख ही भंडारदर्‍याच्या  वन विभागाने  नेमकी हेरली. पावसाच्या आगमनाच्या अगोदर काजव्यांची मायावी दुनिया वनसाम्राज्यात कसे राज्य करते,  हे निसर्ग प्रेमींच्या मनावर बिंबवल आणि  काजव्यांचा हा निसर्गरुपी अविष्कार पुढे काजवा महोत्सव या नावाने उदयास आणला.

या काजवारुपी प्रकाशफुलांचा जंगलात झाडावर चाललेला पाठशिवणीचा खेळ पाहण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक या प्रमुख शहरांसह संपूर्ण महाराष्ट्रच नाही, तर परराज्यांतूनही अनेक निसर्गप्रेमी आसुसलेले आहेत. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा मोजक्याच झाडांवर काजव्यांचा काही दिवसांचाच ‘बसेरा’ असतो. आदिवासी खेड्यांच्या शिवारातली सहस्रावधी झाडे अक्षरशः कोट्यवधी काजव्यांनी लगडून गेली आहेत.भंडारदर्‍याच्या वनामधील काजवा महोत्सव अनुभवण्यासाठी असंख्य निसर्गप्रेमी दाखल होण्याच्या तयारीत असून अनेक मोठमोठी हॉटेल्स सजली आहेत. आदिवासी पट्ट्यामध्येही बर्‍याच ठिकाणी स्वादिष्ट असे जेवण देण्यासाठी स्थानिक तरुण सरसावले आहेत. ग्रामीण भागातील लोकनृत्याची कला ही या कालावधीत राज्य पर्यटन महामंडळ व नाशिक येथील ट्रॅव्हल्स असोसिएशनने या काजवा प्रेमींसाठी आयोजित केली आहेत.  

महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापक नितीन मुंडावरे व भंडारदरा येथील व्यवस्थापक मोकळ यांनी या काजवा महोत्सवाची जोरदार तयारी केली आहे. पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे यांनी केले आहे.