Sun, May 31, 2020 05:08होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : भारतीय रणगाड्यांनी भरवली शत्रूंना धडकी(video)

भारतीय रणगाड्यांनी भरवली शत्रूंना धडकी(video)

Published On: Feb 11 2019 4:17PM | Last Updated: Feb 11 2019 4:23PM
पुणे : प्रतिनिधी

रॉकेटचा अचूक वेध घेणारे रणगाडा विरुधी क्षेपणास्त्र...शत्रूच्या चौक्या नेस्तनाबूत करणारे रणगाडे...चोहोबाजूने होणारा गोळीबार...हेलिकॉप्टर आणि राणगाड्यांमधून शत्रूवर हल्ला...अखेर शत्रूचा खात्मा करून भारतीय सैन्यांनी तिरंगा फडकवला...हा धडकी भरवणारा अनुभव अहमदनगरमधील के.के. रेंज येथे सोमवारी (ता. ११) झालेल्या युद्ध प्रात्यक्षिक प्रसंगी उपस्थितांनी अनुभवला.

भारतीय लष्कराच्या अहमदनगर येथील आर्मड कोअर सेंटर व स्कूल, मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे सोमवारी (ता. ११)  के.के रेंज वर ऑपरेशन कवच प्रहार या युद्ध प्रत्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेजर जनरल नीरज कपूर, ब्रिगेडियर व्ही. व्ही.सुभ्रमान्यम, लष्करातील अधिकारी, मित्र राष्ट्रांच्या लष्कराचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारतीय आर्मर्ड फोर्सचे शान असलेले अर्जुन, भीष्म, अजय, टी-९०, टी-७२, बीएमपी-२ या  रणगाड्यानी लक्ष्यावर मारा करत प्रात्यक्षिकाची झलक दाखवली. यानंतर या सर्व रणगाड्याची माहिती देण्यात आली. 

या प्रत्यक्षिकात लष्कराच्या टँक रेजिमेंटची चपळता, गतिशीलता आणि भेदक रणगाड्यांची मारक क्षमता उपस्थितांनी अनुभवली. लष्काराचे टेहळणी हेलिकॉप्टर, शत्रूवर चाल करुन जाणारे आवाढव्य रणगाडे, कानठळ्या बसवणाऱ्या तोफांचा मारा, गोळीबार असा हा युद्ध भूमीवरचा थरार के. के. रेंज येथे लष्कराच्या प्रात्यक्षिकांमध्ये पहायला मिळाला. तब्बल तीन तासांच्या प्रात्यक्षिकाने अंगावर शहारे आणणारा युद्ध भूमीचा रोमांच पाहून भारताच्या मित्र राष्ट्राचे सैन्य आणि सर्व निमंत्रित थक्क झाले. 

यावेळी अहमदनगरच्या आर्मर्ड कोर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख मेजर जनरल नीरज कपूर म्हणाले, युद्धामध्ये वेगाने निर्णय घेणे आणि त्यानुसार चपळतेने कृती करणे महत्त्वाचे असते. युद्धाच स्वरूप बदलत आहे, यासाठी सैन्य दलानी तयार रहाणे आवश्यक आहे. आजच्या युद्धाचे स्वरूप बदलले आहे. युद्धामध्ये अधिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, याचा मुकाबला करण्यासाठी सैन्यदलात समन्वय आणि एकात्मिकरण असण्याची गरज आहे.