होमपेज › Ahamadnagar › के. के. रेंज जमीन अधिग्रहणप्रकरणी तोडगा काढू

के. के. रेंज जमीन अधिग्रहणप्रकरणी तोडगा काढू

Published On: Mar 07 2018 1:21AM | Last Updated: Mar 07 2018 1:21AMपारनेर : प्रतिनिधी    

लष्काराच्या के. के. रेंजच्या तोफगोळा सरावासाठी अधिग्रहीत करण्यात येणार्‍या पारनेर, नगर व राहुरी तालुक्यांतील जमिनीसंदर्भात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे यांनी लष्कराच्या अधिकार्‍यांकडून स्वयंस्पष्ट आदेश मागविला आहे. अहवालानंतर संबंधित अधिकार्‍यांची संरक्षण भवनामध्ये बैठक बोलवून सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही मंगळवारी दिल्‍ली येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिल्याची माहिती जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी दिल्‍लीहून दिली. 

के. के. रेंजसाठी सध्या या तीनही तालुक्यांतील जमिनीवर तोफगोळ्यांचा सराव करण्यात येत असून, सराव क्षेत्र विस्तारित करण्यासाठी तीनही तालुक्यांतील जमिनींचे मोजमाप करण्यात येत आहे. या जमिनी अधिग्रहीत करण्यात का येऊ नयेत, असे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे अनेक गावांमधील हजारो ग्रामस्थांवर विस्थापित होण्याची वेळ येणार आहे. ते टाळण्यासाठी झावरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना या प्रश्‍नावर तोडगा काढण्याचे अवाहन केले होते. मंगळवारी दिल्‍ली येथे पवार यांच्या उपस्थितीत झावरे यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. विषय समजून घेतल्यानंतर के. के. रेंजचा विषय राज्यमंत्री भामरे यांच्या कार्यकक्षेत येत असल्याने सीतारमन यांच्या सूचनेनुसार पवार,  झावरे यांनी भामरे यांची भेट घेतली.

मंत्री भामरे यांनी संरक्षण विभागाशी संपर्क करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पवार, झावरे यांच्या उपस्थितीत संरक्षण भवनमध्ये संबंधित लष्करी अधिकार्‍यांनी बैठक घेण्यात येईल. या बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही मंत्री भामरे यांनी दिली. 1994 मध्ये संरक्षण मंत्री असताना असाच पेच निर्माण झाला त्यावेळी कशा पद्धतीने हा प्रस्ताव मागे घेण्यास भाग पाडले, याची माहितीही पवार यांनी या चर्चेदरम्यान मंत्री भामरे यांना दिली.