Thu, Apr 25, 2019 11:27होमपेज › Ahamadnagar › सरकारकडून शेतकर्‍यांची थट्टा : खा. शेट्टी

सरकारकडून शेतकर्‍यांची थट्टा : खा. शेट्टी

Published On: Jun 29 2018 12:54AM | Last Updated: Jun 29 2018 12:19AMराहुरी : प्रतिनिधी

राज्यात शेतकर्‍यांवर अन्याय वाढला असून भाजपच्या मेहेरबानीमुळे बँकामधील अधिकार्‍यांची  शेतकर्‍यांच्या बायकांवर वाकडी नजर टाकण्याची हिमंत झाली आहे. सध्या शेतकर्‍यांची थट्टा  सुरू असून भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यास शेतकर्‍यांना शनिवार वाड्यावर भीक मागायला जावे लागेल. त्यामुळे शेतकर्‍यांनी एकत्र येऊन या सरकारला जागा दाखवून द्यावी, असे आवाहन खा. राजू शेट्टी यांनी केले.

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अ‍ॅड. रावसाहेब करपे होते. व्यासपीठावर प्रभाकर गाडे, ज्ञानदेव निमसे, राजू काका निमसे, दत्तात्रय कवाणे, बापूसाहेब मोरे, अनिल इंगळे, सुभाष करपे आदी उपस्थित होते.याप्रसंगी खा. शेट्टी यांनी भाजपकडून शेतकर्‍यांची थट्टा सुरूच आहे. नोटाबंदीच्या काळात  गुजरात राज्यात अमित शहा संचालक असलेल्या बँकेत केवळ 5 दिवसांत 675  कोटी रुपये बदलून दिले जातात. मात्र, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची बँक समजल्या जाणार्‍या जिल्हा बँकेतील 1100 कोटी रुपये रक्कम अडवून धरणारे भाजप सरकारने शेतकर्‍यांना उत्तर देणे गरजेेचे आहे.  राज्य सरकारने छत्रपती शिवरायांच्या नावावर फसवी कर्जमाफी केली. दीडपट हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी देऊ, अशी घोषणा करणारे आत शेतकर्‍यांना फुकटचे सल्ले देत आहेत. तेल कंपन्यांचा फायदा वाढला. इथेनॉल दर वाढविले.

मात्र, तरीही शेतकर्‍यांना लाभ मिळत नाही आहे. शेतीमालाला दीडपट हमीभाव व संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी देशातील 193 शेतकरी संघटना एकत्रित आल्या असून येत्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही विधेयके लोकसभेत मांडले जाणार आहे. शेतकर्‍यांच्या हिताने सर्वच पक्षांनी एकत्र येऊन विचार केला, तर दोन्ही विधेयके संमत होऊन शेतकर्‍यांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. कर्जमाफीचा गोंधळ सुरूच असून बोंडअळीचा निधीही लवकर मिळत नाही. दूध दर घसरल्याने पर्यायी दूध धंदा अडचणीत आला आहे. खरीप पेरण्या कराव्यात की नाही, असा प्रश्‍न शेतकर्‍यांपुढे पुढे उपस्थित झालेला असताना केंद्रात व राज्यातील भाजप सरकार शेतकर्‍यांच्या नावे जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च करून एकप्रकारे शेतकर्‍यांची थट्टा करीत असून भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यास शेतकर्‍यांना शनिवार वाड्यावर भीक मागायला जावे लागेल. तेव्हा शेतकर्‍यांनी एकत्र येऊन भाजप सरकारला जागा दाखवून देण्याची वेळ आल्याचे आवाहन खा. राजू शेट्टी यांनी केली. 

याप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही पूर्वीचे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळापेक्षा वाईट अवस्था भाजप सरकारने आणली असल्याचे सांगत टीका साधली.यावेळी तुपकर यांनी आपले भाषण सुरू असताना टाकळीमिया येथील शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे घोषित केले. याप्रसंगी हंसराज वडघुणे, घनश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, शर्मिला येवले यांनी मनोगत व्यक्‍त केले.