Fri, Jul 19, 2019 01:27होमपेज › Ahamadnagar › जामखेड हत्याकांडातील सूत्रधार अटकेत

जामखेड हत्याकांडातील सूत्रधार अटकेत

Published On: May 06 2018 1:06AM | Last Updated: May 05 2018 11:27PMनगर/जामखेड : प्रतिनिधी

जामखेड येथील दुहेरी हत्याकांडातील मुख्य सूत्रधार उल्हास माने (वय 40) याला पोलिसांनी काल (दि. 5) सकाळी सापळा रचून कर्जत तालुक्यातून अटक केली आहे. उल्हास माने व शुक्रवारी अटक करण्यात आलेला आरोपी विजय सावंत (वय 21) या दोघांना काल दुपारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

जामखेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश अंबादास राळेभात व राकेश अर्जुन राळेभात यांची 28 एप्रिल रोजी गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी गोविंद दत्ता गायकवाड याला एका अल्पवयीन आरोपीसह यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हत्येच्या घटनेपासून मुख्य सूत्रधार असलेला उल्हास माने हा फरार झाला होता. 

पोलिसांनी  पथके विविध ठिकाणी आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठविली होती. उल्हास माने हा कर्जत तालुक्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला शनिवारी (दि.5) सकाळी पकडले. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. आरोपी उल्हास माने याच्या शिवशंकर तालमीत राजकीय बोर्ड लावण्याच्या वादातून हत्या झाल्याचा गुन्हा पोलिसांनी मयत योगेश राळेभात यांच्या भावाच्या फिर्यादीवरून दाखल केलेला आहे. 

हत्याकांडानंतर फरार झालेला माने आठ दिवसांनी पोलिसांना सापडला असून, त्याच्याकडून या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, माने व सावंत या दोघांना काल (दि. 5) दुपारी दोन वाजता जामखेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिस व सरकारी पक्षाच्या वतीने आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले दोन पिस्तूल व मोटारसायकल हस्तगत करणे, पिस्तूल व गोळ्या कोठून आणल्या, याची चौकशी करण्यासाठी 14 दिवसांची पोलिस कोठडी मागण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने या दोघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. 

आरोपी माने व सावंत यांना काल दुपारी जामखेड येथे आणण्यात आल्यानंतर न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व रस्ते काही वेळ बंद करण्यात आले होते. \

Tags : nagar, Jamkhed, murder mastermind, arrested,