Tue, Jul 16, 2019 09:58होमपेज › Ahamadnagar › जामखेड हत्या प्रकरण : वर्षभरापूर्वीच्या वादातून झाली हत्या!

जामखेड हत्या प्रकरण : वर्षभरापूर्वीच्या वादातून झाली हत्या!

Published On: Apr 29 2018 11:53PM | Last Updated: Apr 29 2018 11:45PMनगर/जामखेड : प्रतिनिधी

गेल्यावर्षी तालमीतील मुलांबरोबर राजकीय बोर्ड लावण्यावरून झालेल्या वादातून गोविंद दत्ता गायकवाड (रा. तेलंगशी, ता. जामखेड) व इतरांनी दोघांवर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून जिवे मारले, अशी फिर्याद मयताच्या भावाने दिली आहे. त्यावरून जामखेड पोलिस ठाण्यात कट रचून अग्निशस्त्राने खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मयत योगेश राळेभात व राकेश राळेभात काल (दि. 29)  सायंकाळी जामखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शनिवारी सायंकाळी बीड रस्त्यावरील हॉटेलमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी योगेश राळेभात व रॉकी ऊर्फ राकेश राळेभात या दोघांची हत्या करण्यात आली आहे. याबाबत मयत योगेश यांचे बंधू कृष्णा अंबादास राळेभात यांनी जामखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी (दि. 28) सकाळी दहा वाजता योगेश राळेभात हे बीड रस्त्यावरील बाजार समितीलगत असलेल्या काळे यांचे हॉटेलवर मित्रांबरोबर गप्पा मारत बसले होते. दुपारी 12 वाजेपर्यंत हॉटेलवरच थांबले. त्यानंतर घरी गेले व जेवण, आराम केला. सायंकाळी पाच वाजता योगेश हे पुन्हा त्याच हॉटेलवर मित्रांबरोबर चहा घेत बसले होते. त्यात राकेश राळेभात, सुरेश उर्फ बाबु पवार व इतर काही मित्रांचा समावेश होता. सायंकाळी पावणेसात वाजता कृष्णा यांना दिपक थोरे यांनी फोन करून योगेश यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तूलातून गोळ्या झाडल्याचे सांगितले. त्यानंतर कृष्णा राळेभात यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

जखमी योगेश व राकेश या दोघांना शासकीय रुग्णालयात नेले होते. कृष्णा राळेभात यांनी योगेश यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते बोलू शकले नाहीत. त्यामुळे दुसरे जखमी राकेश राळेभात यांच्याकडे ‘तुम्हाला कोणी गोळ्या घातल्या’, असे कृष्णा राळेभात यांनी विचारले. त्यावर जखमी राकेश यांनी सांगितले की, ‘तेलंगशी येथील गोविंद दत्ता गायकवाड व इतर 4-5 जण दुचाकीवरून आमच्याजवळ आले. एक वर्षापूर्वी उल्हास माने यांचे तालिमीतील  मुलांबरोबर राजकीय बोर्ड लावण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून दोघांवर गोळया झाडल्या.’

कृष्णा अंबादास राळेभात यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात गोविंद दत्ता गायकवाड व इतर 4-5 अनोळखी व्यक्तींविरुद्ध कट रचून बेकायदा जमाव जमवून, गावठी कट्ट्याचा वापर करून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक रोहीदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे आदींसह मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. पोलीस अधीक्षक शर्मा हे रात्रभर जामखेडला ठाण मांडून होते. रविवारी पहाटे गुन्हा दाखल झाल्यानंतर ते नगरला रवाना झाले. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन पगार हे करीत आहेत. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञ, फिंगर प्रिंट तज्ज्ञ आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.