Sat, Apr 20, 2019 10:17होमपेज › Ahamadnagar › जामखेडच्या आवरेचा राष्ट्रकुल स्पर्धेत झेंडा

जामखेडच्या आवरेचा राष्ट्रकुल स्पर्धेत झेंडा

Published On: Apr 13 2018 1:12AM | Last Updated: Apr 13 2018 1:12AMजामखेड : प्रतिनिधी 

तालुक्यातील माळेवाडी येथील सुपुत्र राहुल बाळासाहेब आवारे याने 57 किलो वजन गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात आक्रमक खेळ करत कॅनडाचा स्टिव्हन टाकाशीला याला धूळ चारत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला कुस्तीमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. याची माहिती मिळताच जामखेड तालुक्यात जल्लोष करण्यात आला.                  

तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यात असणारे माळेवाडी हे राहुलचे मूळ गाव. तेथेच त्याची वडीलोपार्जित  शेती आहे. राहुलचे चौथीपर्यंतचे शिक्षण माळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर आवारे कुटुंबीय पाटोदा (जि. बीड) येथे स्थायिक झाले. राहुलचे वडील बाळासाहेब आवारे हे नामांकित कुस्तीपटू. त्यांची राहुल व गोकुळ ही दोन्ही मुले कुस्तीपटू आहेत. घरात कुस्तीचे वातावरण असल्याने राहुलला लहानपणीपासून कुस्तीची आवड होती. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्याने अनेक मैदाने गाजवली. वडीलच त्याचे कुस्तीतील प्रशिक्षक. दोघे बाप-लेक जत्रांमधील कुस्ती फंडामध्ये सहभागी व्हायचे. त्यातून राहुल शिकत गेला. दहावीनंतर तो पुण्याला हिंदकेसरी हरिश्‍चंद्र बिराजदार यांच्याकडे पुढील प्रशिक्षणासाठी गेला. बिराजदार यांनी त्याला कुस्तीतील सगळे बारकावे शिकवले. कुस्तीतील चांगल्या कामगिरीमुळेच राहुलला रेल्वेत नोकरी मिळाली आहे. 

राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत आपल्या मुलाने यश मिळविल्याने बाळासाहेब आवारेंना आकाश ठेंगणे झाले. ते म्हणाले, पाटोद्यापासून 8-10 किलोमीटर अंतरावर तालीम तयार केली होती. तालीम म्हणजे अक्षरश: पत्र्याची शेड होती. राहुलने तेथेच सराव केला. आता आमच्या घरापासून जवळ तालीम आहे. पत्र्याच्या शेडमध्ये खेळलेल्या राहुलने मिळवलेलं यश आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. दरम्यान सन 2008 साली राष्ट्रकुल स्पर्धेत 18 वर्षांखालील स्पर्धेत राहुल विजयी झाला होता. तसेच 2011 मध्ये कॅनडा येथे झालेल्या स्पर्धेतही चांगले यश मिळविले होते. 2017 मध्ये इंदूर येथे झालेल्या सिनियर नॅशनल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.गेल्यावर्षी रिओ ऑलिम्पिकवेळी राहुलची निवड होऊ शकली नव्हती.

त्याबाबत राहुलचा भाऊ गोकुळ सांगतो, रिओ ऑलिम्पिकसाठी राहुलची निवड न झाल्याने तो निराश झाला होता. त्यातून तो जिद्दीने बाहेर पडला. कुस्ती हेच त्याचं जगणं आहे. सिनेमा वगैरेची त्याला आवड नाही. गप्पा मारायला आवडतात. वेळ मिळाला की तो शिर्डी, तिरुपती या धार्मिक स्थळांना भेटी देतो.या यशाबद्दल राहुल याचे जामखेड पंचायत समितीच्या वतीने अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. दिघोळ-माळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. जामखेड शहरात व तालुक्यात अनेक क्रीडाप्रेमींनी राहुलच्या अभिनंदनाचे मोठमोठे फलक लावून आपल्या सुपुत्राचे कौतुक केले आहे.

Tags : Ahmadnagar, Jamkhed, guy, win, medal, Commonwealth Games