Thu, Apr 25, 2019 17:53होमपेज › Ahamadnagar › जामखेड हत्याकांड : आरोपींना कोठडीत खास पाहुणचार

जामखेड हत्याकांड : आरोपींना खास पाहुणचार

Published On: Jun 30 2018 9:47AM | Last Updated: Jun 30 2018 9:47AMजामखेड : प्रतिनिधी

संपूर्ण नगर जिल्ह्याला हादरून सोडणार्‍या जामखेड येथील येथील दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपींना पोलिसांच्या आशीर्वादाने दररोज चिकण व मटनाचे जेवण पुरविले जात असल्याचे उघड झाले आहे. याबाबत हत्याकांडातील मयतांच्या नातेवाईकांनी गुरुवारी (दि. 28) आरोपींना मांसाहारी जेवणाचे डबे देणार्‍यांना रंगेहाथ पकडून दिले. तहसीलदारांनी या जेवणाचा पंचनामा करीत, संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

जामखेड शहरात बीड रस्त्यावर 28 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी सध्या जामखेड येथील तुरूंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने त्यांची खास बडदास्त ठेवली जाते. तसेच त्यांना सर्व सुविधा व बाहेरचे जेवण दिले जाते, अशी लेखी तक्रार फिर्यादी कृष्णा राळेभात यांनी यापूर्वीच तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याकडे केली होती. मात्र, तुरूंग अधिकार्‍यांनी त्याची दखल घेतली नाही. तुरूंगात या आरोपींना शाही जेवण मिळत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर, फिर्यादी कृष्णा राळेभात व नातेवाईकांनी तेथे पाळत ठेवली होती. 

गुरुवारी (दि.28) रात्री 10 वाजता सुदाम राऊत व गणेश बिडकर हे तुरूंगातील कैद्यांना जेवणाचे डबे घेऊन आले. जेवण पुरविणारा ठेकेदार रमेश पिसे याच्यामार्फत जेवणाचे डबे देत असताना या दोघांना तुरूंगाच्या गेटवरच पकडण्यात आले. या नंतर त्यांच्याकडे असलेली पिशवी तपासली असता, जेवणाच्या डब्यात सुके उकडलेले चिकन व रस्सा भरलेल्या पाच किटल्या आढळून आल्या.

यानंतर हत्याकांडातील मयताच्या नातेवाईकांनी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना मोबाईल फोन करून याठिकाणी बोलवून घेतले व सर्व प्रकार सांगितला. सर्वांसमोर पंचनामा करण्यात यावा, असा आग्रह धरला. त्यामुळे सदर जेवणाचा पंचनामा करण्यात आला. यावर तहसीलदार नाईकवाडे यांनी अहवाल मागवून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. या वेळी तुरूंगाच्या बाहेर मोठा जमाव जमला होता. 

दरम्यान, हत्याकांडातील मुख्य आरोपी कैलास माने हा आजारपणाचे कारण दाखवून, पुणे येथे खासगी रुग्णालयात मौजमजा करत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. आरोपी जामखेड तुरूंगात पोलिसांच्या कृपेने मौजमजा करत असल्याने, त्यांना येथून स्थलांतरित करण्यात यावे. अन्यथा हे आरोपी  काहीही करू शकतात. त्यामुळे आम्हाला धोका होऊ शकतो, असा अर्ज कृष्णा राळेभात यांनी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिला आहे.