Thu, May 23, 2019 20:26
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › जलपूजन कार्यक्रमात विधानसभेचा श्रीगणेशा

जलपूजन कार्यक्रमात विधानसभेचा श्रीगणेशा

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 07 2018 10:59PMटाकळीभान : वार्ताहर

टाकळीभान येथील टेलटँकच्या जलपूजन कार्यक्रमात आगामी विधानसभा निवडणुकीचा श्रीफळ वाढवून आ. भाऊसाहेब कांबळे यांनाच ‘वन्स मोर’ आमदार करण्याचा  संकल्प केल्याने राजकीय चर्चेला उकळी फुटली आहे.

टाकळीभान टेलटँकचे जलपूजन कार्यकारी अभियंता किरण देशमुख देशमुख यांच्या हस्ते झाल्यानंतर ग्रा. पं. सदस्य कान्हा खंडागळे मित्रमंडळाच्या वतीने  स्व. गोविंदराव आदिक सभागृहात पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांचा  सत्कार करण्यात आला.  यावेळी आ. भाऊसाहेब कांबळे, पं. स. सभापती दीपकराव पटारे, अभियंता अहिलाजी खैरे, युवानेते सिद्धार्थ मुरकुटे, उपसरपंच पाराजी पटारे, शिवाजीराव धुमाळ, कान्हा खंडागळे आदी उपस्थित होते.

आ. कांबळे म्हणाले की, यावर्षी पाऊस कमी असल्याने पाटपाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत लवकरच विकासकामे सुरू होणार आहे. गावाला सर्व योजनांचा लाभ मिळवून दिला आहे आणि या पुढेही निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पटारे म्हणाले की, आ. कांबळे यांना टाकळीभानकरांनी भरभरून दिले आहे. त्यामुळे त्यांच्यांकडून टाकळीभानच्या विकासकामांत झुकते माप दिले जात आहे. ते शांत,  सहनशील व कर्तव्यदक्ष  असून श्रीरामपूर तालुका विकासकामांत त्यांचा मोठा वाटा आहे. भविष्यातही आमदार म्हणून कांबळेच राहतील व पुन्हा त्यांनाच आमदार करायचे असल्याने टाकळीभानकरांनी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कान्हा खंडागळे म्हणाले, टेलटँक भरण्यासाठी आ. कांबळे यांचे मोठे सहकार्य असून त्यांनी टेलटँक भरून दिल्याने येत्या निवडणुकीत टाकळीभानकरांनी त्यांनाच भरभरून मतदान करावे, असे आवाहन खंडागळे यांनी केले.

यावेळी पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी महेश शेळके, कालवा निरीक्षक बाळासाहेब जपे, बाळासाहेब कोकणे, नगरसेवक सुभाष गांगड, प्रकाश ढोकणे, अ‍ॅड. संतोष कांबळे, शामलिंग शिंदे, पं. स. सदस्य सतीश कानडे, संचित गिरमे, शंतनू फोफसे, लक्ष्मण भवार, बबलू वाघुले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपसरपंच पाराजी पटारे यांनी केले.