Wed, May 22, 2019 16:28होमपेज › Ahamadnagar › बाळू बर्डेला मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा

बाळू बर्डेला मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा

Published On: Aug 08 2018 1:47AM | Last Updated: Aug 08 2018 1:47AMनगर : प्रतिनिधी

अडीच वर्षांच्या चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार प्रकरणातील आरोपी बाळू गंगाधर बर्डे (रा. सोनगाव पाथरी, ता. राहुरी) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि.7) नैसर्गिक मृत्यूपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच या आरोपीला ठोठावण्यात आलेल्या दंडातील 50 हजार रुपये पीडितेला देण्याचे 
निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. न्या. अशोककुमार भिलारे यांनी हा निकाल दिला.

तिशय कोवळ्या वयातील मुलीवरील अत्याचाराची घटना अतिशय गंभीर व मानवतेला काळीमा फासणारी आहे, अशा शब्दांत न्यायालयाने निकाल देताना या घटनेवर भाष्य केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अर्जुन पवार यांनी काम पाहिले, तर तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील होते. 

मजुरी काम करून रेल्वे स्टेशन परिसरात राहणार्‍या एका कुटुंबातील अडीच ते पावणेतीन वर्षांच्या चिमुरडीच्या आई-वडिलांना दि. 8 डिसेंबर 2016 रोजी सायंकाळी खाऊचे आमिष दाखवून आरोपी बाळू बर्डे याने काही रक्कम दिली. 

दिलेले पैसे घेऊन अडीच वर्षांच्या चिमुरडीला बर्डे याच्याकडे काही वेळ ठेवून तिचे आई-वडील खाऊ आणण्यासाठी गेले. त्यानंतर बर्डे याने त्या चिमुरडीचे अपहरण केले. रेल्वे स्टेशनलगत केडगाव परिसरात त्या मुलीवर अनैसर्गिक पाशवी शारीरिक अत्याचार केला. अत्याचारानंतर जखमी पीडितेला एका हॉटेलच्या शेडमध्ये बेशुद्धावस्थेत टाकून देऊन आरोपी बर्डे पसार झाला. अत्याचाराने पीडितेच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झाले होते. पुण्यातील ससून रुग्णालयात तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर सदर पीडिता सध्या रिमांड होम येथे आहे. 

शुक्रवारी (दि.3) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले होते. शिक्षेवर युक्तिवाद करताना सरकारी वकील अ‍ॅड. पवार म्हणाले की, आरोपीने गेलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा व दुर्मिळातील दुर्मिळ आहे. हा अत्याचार केवळ पीडितेवर नसून, हा समाजावर केलेला बलात्कार आहे. त्यामुळे असे अमानवी कृत्य करणार्‍या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्यायला हवी. 12 वर्षांच्या आतील मुलींवर अत्याचार केल्यास आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी, असा अध्यादेश केंद्र सरकारने 21 एप्रिल 2018 रोजी काढला आहे. हा गुन्हा त्यापूर्वीचा आहे. त्यामुळे हा अध्यादेश त्या गुन्ह्याला लागू होत नसला, तरी न्यायालयाने आरोपीला माफ करू नये. या निकालातून समाजात चांगला संदेश जाणे अपेक्षित आहे. या प्रकरणात ‘पुढारी’ने पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सुरुवातीपासून पाठपुरावा केला होता.

सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीला वेगवेगळ्या कलमान्वये सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली. अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिला गंभीर इजा पोहोविल्याप्रकरणी आरोपीस नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेपेची ठोठावली. तसेच दंडाच्या रकमेतील 50 हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेश दिले आहेत.

निकाल ऐकण्यासाठी ‘ती’ न्यायदान कक्षात उपस्थित!

आपल्यावर अत्याचार करणार्‍या आरोपीला देण्यात येणारी शिक्षा ऐकण्यासाठी ती कोवळी चिमुरडी न्यायदान कक्षात आली होती. शिशुगृहातील महिला कर्मचारी व संस्थेचे व्यवस्थापन पाहणार्‍या अधिकारी तिच्यासोबत होत्या. निकालानंतर ती चिमुरडी शिशुगृहाच्या महिलांसोबत न्यायदान कक्षातून निघून गेली.  

अशी झाली शिक्षा

भारतीय दंड संहिता कलम 363 : 3 वर्षे सक्तमजुरी, 5 हजार रुपये दंड, कलम 366 अ : 7 वर्षे सक्तमजुरी, 10 हजार रुपये दंड, कलम 376 (आय)(जे) : नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप, 25 हजार रुपये दंड, कलम 377 : 10 वर्षे सक्तमजुरी, 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास स्वतंत्र कारावासाची शिक्षा आहे. दंडाच्या एकूण रकमेपैकी 50 हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देणार. बालकांपासून लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कलम 6 : भादंवि कलम 376 मध्ये जास्त शिक्षा असल्याने स्वतंत्र शिक्षेची तरतूद नाही.