Thu, Jul 18, 2019 02:06



होमपेज › Ahamadnagar › सासर्‍यांनो, सावधान! जावयांचा धोंडा येतोय

सासर्‍यांनो, सावधान! जावयांचा धोंडा येतोय

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 10:36PM



ढोरजळगाव : बाळासाहेब बर्गे

एरव्ही आपली उपवर मुलगी वराच्या हवाली करताना नवरा मुलगा बोहल्यावर चढताक्षणीच सावधान म्हणून जावयाला ‘सावध’ करणार्‍या सासर्‍यांनाच ‘सावधान’ म्हणून सावध करण्याची वेळ आता जावयांवर आली आहे.

‘आली रे आली आता सासर्‍यांची बारी आली’असे म्हणत अगदी पंधरवाड्यावर धोंड्याचा महिना येऊन ठेपला आहे. धोंड्याचा महिना म्हणजे पुन्हा एकदा सासर्‍यांच्या डोक्यात जावयांचा धोंडाच जणू. अगोदरच लग्न, पाहुणे-राउळे, क पडे, इतर समारंभ यामुळे मेटाकुटीस आलेल्या सासरे लोकांना हा अधिकमास आर्थिकरीत्या तसा जडच जात असतो. सामान्य परिस्थिती असणार्‍या सासर्‍यांना अगोदरच हा खर्च डोईजड झालेला असतो. खर्चामुळे मेटाकुटीस आल्याने आणखी खर्च करणे अवघड होऊन बसते. अर्थात श्रीमंत सासर्‍यांना आपल्या जावयाचे लाड त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पुरवणे शक्य होत असले तरी परिस्थितीने नादान असलेल्या सासरे मंडळींना हा धोंडा डोंगरासमान भासल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

मराठी वर्षाप्रमाणे दर तीन वर्षांनंतर अधिकमास येत असल्याने हा धोंड्याचा महिना म्हणून संबोधला जातो.या महिन्यात नवीन जावयांना धोंड्याचे जेवण खाऊ घातले जाते. अर्थात हे जेवण फक्त जेवण नसते तर त्यामागे जावयाचे प्रचंड ‘चोचले’ लपलेले असतात. या जेवणाच्या निमित्ताने जावयांना प्रसंगी कपड्यांपासून तर थेट सोन्याच्या दागिन्यांनी मढवावे लागते. अगदी थाटात जावयांना जेवण करून त्यांचे पाहिजे तेवढे लाड पुरवावे लागतात.

मग काही जावई सोन्याची चैन मागतात तर कोणी सोन्याच्या अंगठीसाठी बोट पुढे करतात.मग हा प्रकार शेवटी सासर्‍याची परिस्थितीच ठरवत असते,की काय-काय देऊ करायचेय. परिस्थितीनुसार थेट चारचाकी पर्यंतही हा प्रकार जात असतो. अर्थात हे काही सक्तीचे नसले तरी शेवटी जावयाचे मन राखायचे म्हटल्यावर हे सर्व सोपस्कार पार पाडणे सासर्‍यांना क्रमप्राप्त ठरते. मग या सोपस्कारांत कितीही पैसे खर्च होत असले तरी ते करावेच लागतात. वरवर पाहता सासरे मंडळींसाठी हा धोंड्याचा महिना अमंगळ वाटत असला तरी जावईबापूंची मात्र चांगलीच चंगळ करणार आहे हेही नक्कीच.