Sun, Jul 21, 2019 16:12
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › आरोग्य अभियानात २ कोटींची अनियमितता!

आरोग्य अभियानात २ कोटींची अनियमितता!

Published On: May 24 2018 1:31AM | Last Updated: May 23 2018 11:46PMनगर : प्रतिनिधी

एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण आरोग अभियानांतर्गत महापालिकेला मिळालेल्या निधीमध्ये तब्बल 2.12 कोटींची गंभीर अर्थिक अनियमितता झाल्याचा ठपका अभियान संचालकांनी वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांवर ठेवला आहे. त्याबाबतचा अहवाल सादर करुन कारवाई प्रस्तावित केलेली असतांनाही तत्कालीन आयुक्‍त घनश्याम मंगळे यांनी हा अहवाल दडवून डॉ. अनिल बोरगे यांना पाठिशी घातल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केली आहे. दरम्यान, 1.53 कोटींची देयके व व्हाउचर उपलब्ध करुन देईपर्यंत मनपाचे अनुदानही थांबविण्यात आले आहे.

2016-2017 व 2017-2018 या कालावधीत मनपाला दिलेल्या निधीच्या खर्चाचे लेखापरीक्षण राज्य आरोग्य सोसायटीच्या अधिकार्‍यांकडून करण्यात आले होते. त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याकडे सादर केलेल्या अहवालात एकूण 2.12 कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचे स्पष्ट करुन 1.87 कोटींची रक्कम वसूलपात्र दर्शविली आहे. सुमारे 1.53 कोटी रुपयांच्या खर्चाची कागदपत्रे, देयकांचे व्हाऊचर तपासणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतरही अनेक आक्षेप या तपासणीत नोंदविण्यात आले आहेत. अहवालात घेण्यात आलेल्या आक्षेपांबाबत अनुपालन अहवाल स्पष्ट अभिप्रायांसह सादर करावा. मुदतीत उत्तर प्राप्त न झाल्यास अनियमिततेबाबत वैद्यकीय आरोग्याधिकार्‍यांवर अनियमिततेचे दायित्व निश्‍चित केले जाईल, असा इशारा अभियान संचालक डॉ. संजीव कुमार यांनी दिला आहे. याची पूर्तता होईपर्यंत महापालिकेला दिले जाणारे अनुदानही थांबविण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अभियान संचालकांनी आयुक्‍त मंगळे यांना सदरचा अहवाल सादर करुनही त्यावर कुठलीही कार्यवाही केलेली नाही. या उलट याला जबाबदार असलेल्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांच्याकडेच हे प्रकरण पाठवून त्यांना पाठिशी घातल्याची तक्रार शेख यांनी केली आहे. या प्रकरणी दखल घेवून वैद्यकीय आरोग्य अधिकारी व संबंधित वरीष्ठ अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करुन कारवाई करावी, अशी मागणीही शेख यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे.

लेखापरीक्षण पथकालाच दिली धमकी!

डिसेंबर 2017 या तिमाहीच्या समवर्ती लेखा परीक्षणावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांनी लेखा परीक्षण पथकातील अधिकार्‍यांना फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचेही या अहवालातून पुढे आले आहे. याबाबत संबंधित अधिकार्‍यांनी तक्रारही केली आहे. सदरची बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून या प्रकरणी वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांवर आपल्यास्तरावर कार्यवाही करावी, असे निर्देशही अभियान संचालक संजीव कुमार यांनी आयुक्‍तांना दिले होते. त्यावरही कुठलीच कार्यवाही झालेली नाही.