होमपेज › Ahamadnagar › गंगागिरींच्या सप्ताहाचे पंतप्रधानांना निमंत्रण

गंगागिरींच्या सप्ताहाचे पंतप्रधानांना निमंत्रण

Published On: Apr 07 2018 1:41AM | Last Updated: Apr 07 2018 12:28AMशिर्डी : प्रतिनिधी 

साईंचा श्रद्धा सबुरीचा मंत्र जगभर पोहोचविण्याचा आपण सारेजण मिळून प्रयत्न करू या. आज जगाला याच मंत्राची गरज आहे, असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केले. श्री साईबाबा समाधी शताब्दीचे औचित्य साधून शिर्डी येथे योगीराज श्री गंगागिरी महाराज यांच्या 171 व्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे निमंत्रण देण्यासाठी आज (गुरुवारी) खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या नेतृत्त्वाखाली सप्ताह समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना सप्ताहाचे निमंत्रण दिले. यावेळी सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज हेही उपस्थित होते.

दिल्लीतील संसद भवनमध्ये दुपारी एक वाजता झालेल्या या बैठकीत गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची वैशिष्ट्ये नेमकी काय आहे हे खासदार लोखंडे यांनी पंतप्रधानांना विषद करून सांगितली. यावर पंतप्रधानांनी विविध प्रश्न विचारून मोठ्या उत्सुकतेने सप्ताहाबद्दल जाणून घेतले. भाकरी व आमटीचा महाप्रसाद म्हणजे नेमके काय, ट्रॅक्टरद्वारे होणारी भाकरीची वाहतूक, टँकरद्वारे होणारी आमटीची वाहतूक, लाखो लोकांना महाप्रसाद कसा वाढला जातो अशा अनेक गोष्टी त्यांनी मोठ्या कुतूहलाने जाणून घेतल्या. यावेळी शिष्टमंडळाशी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, श्री साईबाबांचा ‘सबका मलिक एक’ हा मंत्र’ मी नेहमी देशभर सांगत असतो माझे मोठे बंधू सोमाभाई यांनी गुजरातमध्ये त्यांच्या राहत्या घराशेजारी मोठे साईमंदिर बांधलेले आहे. 

आमचे संपूर्ण कुटुंब साईभक्त आहे. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना शिर्डीला आलो होतो, आता पुन्हा शिर्डीला येण्याची माझी इच्छा आहे. सप्ताहाबद्दल माहिती जाणून घेतल्यावर पंतप्रधानांनी मी सप्ताह कालावधीत नेमक्या कोणत्या दिवशी शिर्डीला आले पाहिजे, असे विचारले असता खासदार लोखंडे यांनी सात दिवसांत कधीही आले तरी चालेल असे सांगितले. यावर पंतप्रधानांनी सप्ताहानिमित्त शिर्डीला नक्की येणार असे आश्वासन दिले.

पंतप्रधानांसोबतच्या या बैठकीला सप्ताह समितीचे अध्यक्ष तुकाराम गोंदकर, कमलाकर कोते, शिवाजी गोंदकर, विजयराव कोते, रवींद्र गोंदकर, राजेंद्र गोंदकर, भाजयुमोचे शहराध्यक्ष साईराज कोते, यांच्यासह सराला बेटाचे मधुमहाराज व बाळासाहेब कापसे उपस्थित होते.

 

Tags : Shirdi, Shirdi news, Gangaagiri Week, PM, Invitation,