Wed, Nov 14, 2018 20:54होमपेज › Ahamadnagar › गुंतवणूकदारांना तब्बल ४० लाखांना गंडविले!

गुंतवणूकदारांना तब्बल ४० लाखांना गंडविले!

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 19 2018 12:01AMनगर : प्रतिनिधी

‘एफडी’ गुंतवणुकीच्या नावाखाली 40 लाख रुपयांना गंडा घालणार्‍या श्रीगोंद्यातील डॉक्टरसह तिघांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2009 ते 2015 दरम्यान ही घटना घडली.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये डॉ. संतोष विश्‍वनाथ कोथिंबिरे (रा. कोथिंबिरे मळा, श्रीगोंदा), भगवतीबाई रतासिंग सिसोदिया, संतोष जवाहर सिंग पावार (दोघे रा. मथ्सी, शहाजापूर, मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे. याबाबत संगिता सोमनाथ तरटे (रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाडिया पार्क येथील गाळा नंबर 11 येथे रिलायबल ग्रुप अ‍ॅण्ड कंपनीच्या अधिनस्त रिलायबल लॅण्ड सोर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली होती. त्या कंपनीत ‘एफडी’च्या पावत्या करून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांकडून 39 लाख 84 हजार रुपयांची रक्कम जमा करून घेतली. मुदत संपनूही ती रक्कम गुंतवणुकदारांना परत न करता कंपनीचे कार्यालय बंद करून गंडा घातला.

याप्रकरणी संगीता तरटे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध संगनमताने विश्‍वासघात करून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी नागवे हे करीत आहेत.